अभिमानास्पद कामगिरी

0

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून बुधवारी सकाळी एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. इस्त्रोच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते आणि इस्रोनेही आपल्या लौकिकाला जागत न भूतो न भविष्यती अशी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली. इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या साहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. उड्डाणापासून ते अंतराळाच्या कक्षेत उपग्रह वेगळे होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात सर्व काही नियोजनाप्रमाणे पार पडले आणि इस्त्रोने यापूर्वीचा स्वत:चा एकाच वेळी 20 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणार्‍या अमेरिका आणि रशियालाही न जमलेली कामगिरी भारताने करून दाखवली आहे. अवकाशात सोडलेले 104 पैकी 101 उपग्रह अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स अशा प्रगत देशांचे आहेत. त्यातही विशेष करून अमेरिकी उपग्रहांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेही प्रगत देशांच्या वरताण कामगिरी करून इस्रोने या क्षेत्रातील भविष्यातील अर्थकारणाला वेगळी चालना दिली आहे. इस्त्रोची ही कामगिरी या अर्थानेही स्पृहणीय आहे.

इस्त्रोेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. प्रारंभीच्या काळात इस्त्रोेची उद्दिष्टे मर्यादित होती. परंतु, पुढे इंदिरा गांधी यांच्या काळात अन्नधान्याच्या उत्पादनापासून ते अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट निश्‍चित केले गेले. त्यातून अंतराळ संशोधनासाठी ‘इस्त्रो’ची स्थापना केली गेली. त्यानंतर अवघ्या सहाच वर्षांत ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाची जुळणी देशातील शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखवली. इस्त्रोेच्या वाटचालीचा हा पहिला टप्पा होता. ‘इन्सॅट’ उपग्रहांची मालिका कार्यरत करणे हा दुसरा आणि 1990 पासून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही) तसेच भूसंकलिक उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही) पूर्णत: भारतीय संशोधनातून बनवले जाण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनेही इस्त्रोेने स्वत: बनवणे, हा तिसरा टप्पा. ‘चांद्रयान’ ते ‘मंगलयान’ या चौथ्या टप्प्यावर आता आपण आहोत. या सर्व टप्प्यांत कोणतीही वाच्यता न करता, देशाच्या संरक्षणाची गरज भागेल असे कामही इस्त्रो करीत आली. मुख्य म्हणजे या सर्व वाटचालीत इस्त्रोेची स्वायत्तता कधीही धोक्यात आली नाही.

थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व के. कस्तुरीरंगन यांनी इस्रोच्या भविष्यातील वाटचालीची पायाभरणी केली. प्रखर देशाभिमान आणि आपल्या ध्येयावरची अविचल निष्ठा हे या शास्त्रज्ञांचे गुण सर्वांनीच अंगीकारावे असे आहेत. यांमुळेच असाध्य गोष्टीही कशा साध्य करता येतात, हे अशा शास्त्रज्ञांनी आपल्या कामातूनच दाखवून दिले आहे. इस्त्रोेच्या आजच्या यशात अशा शास्त्रज्ञांची कामगिरी म्हणूनच मैलाचा दगड ठरणारी आहे आणि तिचेही स्मरण आपण कृतज्ञतापूर्वकच करणे गरजेचे आहे.

इस्त्रोे आपल्या कामाचा गवगवा करीत नसल्याने तेथे काय चालले आहे, याची माहितीही देशवासीयांना नसते. तथापि, तातडीची उद्दिष्टे व दीर्घकालीन हेतू यांची सांगड ही संस्था नेहमीच घालत आली आहे. मुख्य म्हणजे अंतराळ संशोधनात नवनवे मानदंड निर्माण करणार्‍या इस्त्रोेला आजवर नेहमीच तुटपुंज्या निधीतच काम करावे लागले आहे. मात्र, या संस्थेत काम करणारे शास्त्रज्ञ किंवा कर्मचार्‍यांनी कधीही अपुर्‍या निधीविषयी कधी आक्रस्ताळ्या मुलाखती दिलेल्या नाहीत की साधी नाराजीची भावनाही व्यक्त केलेली नाही. आहे त्या साधनांनिशी काम करत राहणे हेच ध्येय ही संस्था बाळगते म्हणूनच ती नवे मानदंड निर्माण करू शकते. इस्त्रोेकडून हेही शिकण्यासारखे आहे.

आर्थिक स्तरावर इस्त्रोे स्वयंपूर्ण व्हावी यासाठी परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. अमेरिका हा या बाजारातील आघाडीचा शिलेदार. नासानंतर आता खासगी संस्थाही तिथे या व्यवसायात उतरल्या आहेत. अमेरिकेशिवाय रशियासारखा स्पर्धकही आहेच. चीनने या क्षेत्रात मोठी भरारी घेतली असली, तरी उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारात तिचा अद्याप बोलबाला नाही. चीनबाबत अन्य देशांना भारताइतका भरवसाही वाटत नाही. उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारात भारताचा हिस्सा 5 टक्के असला, तरी तो सातत्याने वाढतो आहे. हा हिस्सा वाढण्याचे कारण आहे, तो या क्षेत्रातील उच्च दर्जा आणि किफायतशीर दर. किफायतशीर दरात व सुरक्षितपणे आपले उपग्रह प्रक्षेपित केले जाणार असतील, तर प्रगत देशही इस्रोकडेच धाव घेतील, हेही आजच्या कामगिरीने सिद्ध झाले आहे. यामुळे जशी आपल्या परकीय गंगाजळीत वाढ होण्यास मदत होणार आहे, अमेरिका किंवा अन्य प्रगत देशांतील या क्षेत्रातील कंपन्यांनाही टक्कर देणारा समर्थ पर्याय म्हणून इस्त्रो पुढे आली आहे, हाही या कामगिरीचा मथितार्थ आहे. यातूनच पुढे उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारात दरयुद्ध भडकले, तर आश्‍चर्य वाटू नये. परंतु, यात आपल्यासाठी अभिमानाची बाब ही की, इस्त्रोे यात आघाडीवर असून, पुढेही ती हीच धवल कामगिरी कायम ठेवेल.