अभियंत्यांचा उचित सन्मान व्हायला हवा

0

पुणे । भारताच्या विकासात अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. केवळ 2 टक्के भ्रष्टाचार करणार्‍या लोकांमुळे 98 टक्के प्रामाणिक अभियंत्यांवर खापर फोडले जाते. अभियंत्यांची होत असलेली ही उपेक्षा थांबावी. तसेच, त्यांचा उचित सन्मान व्हावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी केले.
विकासकर्मी अभियंता मित्र, सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभाग आणि पुणे महानगरपालिका अभियंता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या वाढदिवसानिमित्त व कमलाकांत वडेलकर यांच्या एकसष्टीनिमित्त गुणवंत अभियंते आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांना ’अभियंता मित्र पुरस्कार’ देऊन डॉ. सबनीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमावेळी अभियंते अजित पवार, नंदकुमार वडनेरे, विजयकुमार ठुबे, अर्जुन कोकाटे याप्रसंगी उपस्थित होते.

अभियंता विकासाचा केंद्रबिंदू
अभियंता हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. बुद्धिमत्तेच्या आणि कल्पकतेच्या जोरावर तो विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांची उभारणी करतो. मात्र, शेवटी त्या कामाच्या श्रेयात त्याचे स्थान नसते. कोनशिलेवर पुढार्‍यांचे नाव घातले जाते. अशा या अभियंत्यांच्या कथा व व्यथा मांडण्यासाठी कमलाकांत वडेलकर अभियंता मित्रच्या माध्यमातून गेली 30 वर्षे काम करत आहेत. विकास आणि अभियंता यांच्यातील अनुबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे, असे सबनीस यांनी यावेळी सांगितले.

अभियंता वावरतो दडपणाखाली
अभियंता या घटकाचे समाजात मानाचे स्थान कसे निर्माण होईल, यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कंत्राटी कामगारांनाही बरोबर घेऊन काम केले पाहिजे. अडचणी खूप आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अभियंता वर्ग सध्या दडपणाखाली आहे. त्यावर ’अभियंता मित्र’ने काम करावे, असे अजित पवार यांनी सांगितले. व्ही. एन. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.