अभियंत्यांना गटारीच्या पाणीचे ‘गिफ्ट’

0

जळगाव। वाटीका आश्रम जवळील गौरव पार्क येथील नागरिकांनी वारंवार मनपाकडे तक्रार करून ही रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईटसह सुविधा दिल्या नाहीत. परिसरात पक्क्या गटारी नसल्याने या गटारींचे पाणी रस्त्यांवर येत आहे. याला कंटाळून नागरिकांनी हातात गटारीचे पाणी घेवूनच मनपा गाठली. यात संदिप पवार, विवेक सुर्यवंशी, अरविंद जगताप, पंकज पाटील, गौरव पाटील, दिनेश चौधरी, नरेंद्र बागुल आदींचा समावेश होता.

वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
यानंतर या नागरिकांनी थेट बांधकाम अभियंता एस. एस. भोळे यांचे कार्यालयात जावून त्यांची भेट घेवून समस्या मांडाल्या. यावेळी गांधीगीरीकरत नागरिकांनी बांधकाम अभियंता भोळे यांना पुष्पगुच्छ भेट दिला. नागरिकांनी भोळे यांना कॉलनीत पथ दिवे नसल्याने अंधार राहत असल्याचे सांगितले. तसेच येथे नेहमीच साप निघत असल्याचे भोळे यांच्या निदर्शनास आणून दिले. मागील वर्षी दोन जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचेही यावेळी नागरिकांनी सांगितले. गौरव पार्क येथे गटारी करण्याच्या मागणीसाठी डिसेंबर 2016 साली निवेदन देण्यात आले होत. मात्र, अद्यापही तेथे महापालिकेतर्फे गटारी करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पहावयास मिळत आहे. नागरिकांनी आपल्या सोबत आणलेल्या गटारीचे पाणी असलेले गिफ्ट भोळे यांना दिले. यानंतर भोळे यांनी गौरव पार्क येथे प्रत्यक्ष पहाणी करण्याचे आश्‍वासन दिले. बांधकामविभागाकडे केवळ एकच जेसीबी असल्याने शहरातील समस्या सोडविण्यात अडचणी येत असल्याचे अभियंता भोळे यांनी सांगितले.