अभियंत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविले मोबाईल अ‍ॅप्लिकेशन

0

शहादा:पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘कारागीर’ या नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्याचे लॉन्चिंग समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य डॉ.डी.एम.पटेल, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, प्राचार्य बी.के.सोनी, प्लेसमेंट ऑफिसर प्रा.आर.एस.पाटील, संगणक विभाग प्रमुख प्रा.व्ही.एस. महाजन आदी उपस्थित होते.

आत्मनिर्भर भारत संकल्पनेने प्रेरीत होऊन अ‍ॅप्लिकेशन विकसित
सध्याच्या धावपळीच्या काळात आपल्या दैनंदिन छोठ्या-मोठ्या कामांसाठी कुशल व अकुशल कारागिर व सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांची आपणास गरज वाटत असते. ते सहजासहजी उपलब्ध नसतात. आपली हीच गरज ओळखून व कौशल्य विकास अभियानाला चालना मिळावी म्हणून या सर्व घटकांना एकाच मंचावर आणण्याचा छोटेखानी प्रयत्न विद्यार्थांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेने प्रेरीत होऊन डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी दर्शन पाटील, भूषण कोळी, प्रकाश सोनार यांनी आपल्या नंदुरबार जिल्हा वासियांसाठी ‘कारागीर’ नावाचे एक सर्व्हिस प्रोव्हायडर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे.

एका क्लीकवर संपर्क
मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने आपण आपल्याला गरज असलेल्या सर्व प्रकारच्या कुशल व अकुशल कारागीरांशी व सर्व्हिस प्रोव्हायडरांशी एका क्लीकवर संपर्क साधु शकतात. ‘कारागीर’ अ‍ॅप्लिकेशन खालील सर्व्हिसेस आपल्याला मिळवून देईल. यात प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, पेस्ट कंट्रोल, लोकल ट्रान्सपोर्ट आदींचा समावेश आहे. हे अ‍ॅप्लिकेशन बनविण्यासाठी प्रा. विनय टी.पाटील आणि संगणक विभागाच्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.