जळगाव । साहित्याचे अभिवाचन स्पर्धांच्या माध्यमातून डोळस दृष्टी तयार होत आहे. अभिवाचन करण्यासाठी साहित्याची समज असणे आवश्यक आहे. आपण अभिवाचन करीत असलेली संहिता नीटपणे समजून घेतली तर आपले अभिवाचन अधिक परिणामकारक होऊ शकते हा वाचिक अभिनयाचा संस्कार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी नव्या पिढीची आहे असे मत नाशिक येथील नाट्य दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाची प्राथमिक फेरी मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्याच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.एन.व्ही.भारंबे होते.
स्पर्धेत 11 संघानी नोंदवला सहभाग
अभिवाचन स्पर्धेत अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, जळगाव आणि परिवर्तन जळगाव या संघांची चाळीसगाव येथे होणार्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. आय.एम.आर. महाविद्यालय, जळगाव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. वाचिक अभिनयाची पारितोषिके संजय निकुंभ, धनंजय धनगर, वर्षा उपाध्ये, राकेश गवळी, साधना भालेराव यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.या अभिवाचन स्पर्धेत एकूण 11 संघांनी सहभाग घेतला. त्यात्त परिवर्तन जळगाव, अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान, मू.जे. महाविद्यालय, आय.एम.आर. महाविद्यालय, प.न.लुंकड कन्या शाळा, काशिनाथ पलोड हायस्कूल, खान्देश नाट्य प्रतिष्ठान, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आदी संस्थांमधील संघाचा सहभाग होता.