पुणे । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नूसार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन अर्ज करतानाच जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता प्रवेशापूर्वीच विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयचे सहसंचालक डॉ. एस. के. महाजन यांनी दिली.पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतच्या पदविका सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिली.अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, एमबीए, एमसीए, पॉलिटेक्निक या पदवी व पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्या मागास सवंर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
डॉ. महाजन म्हणाले, दरवर्षी मागास वर्गीय गटातून विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. या सर्वांकडेच जात वैधता प्रमाणपत्र नसते. त्यासाठी समाजकल्याण विभागाकडून हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन-सहा महिन्यांची मुदत दिली जाते. त्या कालावधीत त्यांनी हे प्रमाणपत्र काढून, ते तंत्रशिक्षणकडे सादर करणे आवश्यक असते. मात्र काही विद्यार्थी हे प्रमाणपत्रास पात्र नसतानाही प्रवेश घेतात. हे निदर्शनास येतात, त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाते. हा प्रकार होऊ नये म्हणून ऑनलाईन अर्ज करतानाच हे प्रमाणपत्र असणे आवश्यक केले आहे.
बनावट कागदपत्रांना पायबंद
त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी अर्ज करतानाच जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी करण्याचा निर्णय तंत्रशिक्षणने घेतला आहे. त्यामुळे बनावट कागदपत्राच्या आधार प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना पायबंद बसणार आहे. त्याची सुरुवात येत्या जूनपासून सुरू केली जाणार आहे. अर्ज करतानाच जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून करून अर्ज स्वीकारला जाणार आहे.
सर्व प्रवेश ऑनलाईन
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश दरवर्षी ऑनलाईन केले जातात. त्यांचे प्रवेश यंदापासून तंत्रशिक्षण संचालनालयकडून होणार आहे. मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून कृषीचे प्रवेश योग्य पद्धतीने होत असून, त्यातून कोणतेही तक्रार नाहीत. त्या पद्धतीने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि आऊटसोर्सिंग करून येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रायोगिक तत्वावर काही अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा विचार आहे. मात्र येत्या 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या फक्त प्रवेश अर्ज ऑनलाईनद्वारे होतात. मात्र कागदपत्रांची पडताळणीही प्रत्यक्ष सुविधा केंद्रातून होतात. त्यात बराच वेळ जातो. त्यासाठी सर्वच प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्यासाठी पाऊले उचलले जात असल्याचे महाजन यांनी नमूद केले.
अन्यथा सर्वसाधारण गटातून प्रवेश
सर्वोच्च न्यायालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज करताना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. त्या कालावधीत हे प्रमाणपत्र नसल्यास, संबंधित विद्यार्थ्यांना मागास वर्गीय गटातून प्रवेश दिला जाणार नाही.