शिंदखेडा। एक महिन्यापेक्षा अधिक असलेला सुटीचा कालावधी आणि लग्नसराई यामुळे शिंदखेड्यात रेल्वेच्या प्रवाशांचा महापूर पाहायला मिळत आहे. विशेषतः सुरत-भुसावळ मार्गावर गाडया कमी असल्याने गर्दी खूप वाढली आहे. या मार्गावर अमरावती-उधना ही फास्ट पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. खानदेशातील खूप मोठा वर्ग व्यवसायाच्या निमित्ताने गुजरात राज्यात स्थायिक झाला आहे. एसटी व रेल्वेच्या भाड्यामध्ये मोठा फरक असल्याने हे प्रवासी रेल्वेनेच प्रवास करायला प्रथम पसंती देतात. दररोज हजारो प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. परंतू या प्रवाशांसाठी दोनच गाड्या आहेत.
अमरावती-सुरत गाडी नियमित करावी
या मार्गावर भुसावळ-सूरत पॅसेंजर ही दररोज धावणारी आणि अमरावती -सूरत फास्ट पॅसेंजर आठवड्यातून तीनच दिवस धावणारी अशा दोनच गाड्या आहेत. सध्या सुट्ट्या आणि लग्न सराईमुळे या गर्दीत आणखीनच भर पडली आहे. ज्या स्टेशनवरून गाडी प्रथमसुटते तिथूनच गाडीमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रवाशांच्या सोयीच्या गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे. आठवड्यातून तीन दिवस धावणारी अमरावती-सुरत ही गाडी रोज नियमित करण्यात यावी. तसेच अमरावती-उधना ही फास्ट पॅसेंजर पुन्हा नव्याने सुरू करण्यात आल्यास प्रवासी व व्यापारी वर्गासाठी विशेष सोय होईल. गेल्या वर्षी अमरावती-उधना गाडी सुट्टीच्या काळात सुरू करण्यात आली होती. यंदा मात्र अर्धी सुट्टी संपली तरी अद्यापही गाडी सुरू करण्यात आली नाही. या मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाने नंदूरबार-सुरत ही शटल सेवा सूरू केली आहे. याच धर्तीवर नंदूरबार-भुसावळ अशी शटल सेवा सुरू करण्याची मागणी देखील प्रवाशांनी केली आहे.