पुणे । शहरात हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांची विक्री करणार्या आरती मिसाळसह तिच्या 9 साथीदारांविरोधात खडक पोलिसांनी मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आरती महादेव मिसाळ ऊर्फ आरती विशाल सातपुते ऊर्फ आरती मुकेश चव्हाण (वय 27, रा़ इनामके मळा, लोहियानगर), पूजा महादेव मिसाळ ऊर्फ पूजा ज्योतिबा तांबवे (वय 32, रा़ लोहियानगर), निलोफर हयात शेख (वय 27, रा़ हरकारनगर), अजहर ऊर्फ चुहा हयात शेख (वय 24, रा. हरकारनगर), रॉकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय 23, रा़ रामटेकडी, हडपसर), गोपीनाथ नवनाथ मिसाळ (वय 22, रा़ लोहियानगर), हुसेन पापा शेख (वय 28, रा़ मुंबई), आयेशा ऊर्फ आशाबाई पाप शेख (मुंबई) व जुलैखाबी पापा शेख (मुंबई) यांच्यावर अमली पदार्थ विक्रीप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा 1999नुसार कारवाई करण्यात आली होती.
एनडीपीएस अॅक्ट व मोक्का कलम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करून गोपीनाथ मिसाळ, हुसैन पापा शेख यांना अमली पदार्थांसह अटक केली होती. आरती मिसाळ टोळीतील हे सर्व जण मुंबईतील आयशा ऊर्फ आशाबाई पापा शेख हिच्याकडून अमली पदार्थ विकत घेत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीमार्फत आरती मिसाळ शहरातील ओळखीच्या विशेषत: तरुणांना हेरॉईन, चरस, गांजा अशा प्रकारचे अमली पदार्थ विक्री करत होती. जिल्हा न्यायाधीश व अपर सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात एनडीपीएस अॅक्ट व मोक्काच्या कलमांनुसार 9 जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक पुढील तपास करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्तांचे आदेश
या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून ती प्लॉट, घर, वाहने खरेदी करत होती. तिच्याकडून अमली पदार्थांसह एक मोटार, एक दुचाकी, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबर यांच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यानंतर मोक्कांतर्गत कारवाईसाठी अपर पोलीस आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार त्यांनी 25 जानेवारी रोजी या सर्वांविरोधात मोक्कानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला न्यायालयाने दखल घेण्याबाबत मंजुरी दिली.