मुंबई – वाकोला परिसरातून ड्रग्जचा सर्वात मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. कारमधून १०० किलो फेंटानिल ड्रग्ज आझाद मैदान अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले आहे. या १०० किलो फेंटानिल ड्रग्जची किंमत अंदाजे १ हजार कोटींच्या घरात आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. थर्डी फर्स्टच्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे डीसीपी शिवदीप लांडे यांनी ही माहिती दिली.
अमेरिकेत बंदी असलेल्या आणि हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण बनलेल्या फेंटानिल या ड्रग्ज केमिकलची मुंबईतून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे युनिटच्या अधिकाऱ्यांनी वाकोला येथे छापा टाकून सलीम डोला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी, घनःश्याम तिवारी या चौघांना ताब्यात घेतले.
या ठिकाणी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये त्यांच्याकडे फेंटानिल हे ड्रग्ज सापडले. फेंटानिल या ड्रग्जचा इतक्या मोठ्या प्रमाणावर कशासाठी साठा करून ठेवला आणि ते कुठे घेऊन चालले होते याबाबत त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. पोलिसांनी सुमारे शंभर किलो ड्रग्ज त्यांच्याकडून हस्तगत केले असून औषध बनविण्याच्या एखाद्या कंपनीतून हे येत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांनी या ड्रग्जचा साठा करण्याचा परवाना असल्याचे म्हटले आहे. दरम्यान महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या चौघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.