अमळनेर: अमळनेर शहरात पिण्याच्या पाण्यावरून सत्ताधारी नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. वैयक्तिक राजकारणासाठी अमळनेरकरांना वेठीस धरले जात आहे. त्याला नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील व त्यांचे पती माजी आमदार साहेबराव पाटील जबाबदार आहेत. यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे सत्ताधारी नगरसेविका रत्नमाला महाजन, कमलबाई पाटील, शितल यादव, संगीतापाटील, नूतन पाटील, राधाबाई पवार, प्रताप शिंपी, सुरेश पाटील, संतोष पाटील, घनश्याम पाटील, संजय भिल आदींनी केली आहे. राजीनामा दिला नाही तर प्रत्येक प्रभागातून मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला.
पाणी टंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही, दुष्काळ असुन पाणीपुरवठा यंत्रणा पुर्णत: कोलमडली आहे. १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस नगरपरिषदेत येत नाही, मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजुर करून दिला आदी मुद्द्यांवरून नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.