अमळनेरच्या सेवेकर्‍याचा बोरी नदीपात्रात मंडप बांधताना सीडीवरून पडल्याने मृत्यू

अमळनेर : बोरी नदी पात्रात यात्रोत्सवानिमित्त मंडप बांधताना सीडीवरून पाय घसरून पडल्याने सेवेकरी राजेंद्र नारायण सुतार (55, माळी वाडा, अमळनेर) यांचा मृत्य झाला. ही घटना 5 रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सभा मंडप बांधताना दुर्घटना
शहरातील बहादरपूर रोडवरील माळी वाड्यातील रहिवासी हे संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त बोरी नदीतील संत सखाराम महाराज समाधी मंदिराजवळ गुरुवार, 5 रोजी रात्री दीड वाजता मंडप बांधत होते. मंडप बांधताना सिडीवरून पाय घसरल्याने राजेंद्र सुतार हे जमिनीवर पडले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तश्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी घोषित केले. अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दहा लाखांची मदत
घटनेची माहिती मिळताच प्रसाद महाराज हे दवाखान्यात पोहोचले. आपल्या भक्तावर घडलेला प्रसंग पाहून प्रसाद महाराजांचे मन हेलावले. महाराजांनी मिस्त्रीच्या परिवाराला 10 लाखांची मदत दोन मुलींच्या विवाहासाठी अन्न वस्त्र यांचा खर्च आणि मुलाला रोजगार देण्याचे आश्वासन दिले. कमावता माणूस गेल्याने सुतार परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा असा परीवार आहे.