अमळनेर। जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशाने चार वाळूमाफियांचे एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्यात आहेत. हे प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी शनिवारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यातील बोरी, तापी व पांझरा नद्यांमध्ये वाळू चोरट्यांनी कहर केला आहे. राजकीय वरदहस्ताने या माफियींना चांगलेच फावले आहे. महसूल प्रशासनातील अधिकार्यांना धमक्या देणे, ट्रॅक्टर पळवून नेणे आदी प्रकार नित्याचेच होते. याचा मोठ्या प्रमाणात प्रशासनाला त्रास होत आहे. बेसुमार अवैध वाळू उपशाने नदीपात्राचा संपूर्ण र्हास होत आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी याची गंभीर दखल घेऊन वाळू चोरांचे एमपीडीए प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत.
तहसीलदारांनी पाठविले प्रस्ताव
याअनुषंगाने तहसीलदार पाटील यांनी वाळू चोरीचे गुन्हे दाखल झालेले व दंड भरलेल्या चार वाळू चोरट्यांचे प्रस्ताव तयार केले असून, लवकरच जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, यापूर्वी अवैध वाळू चोरीप्रकरणी नगरसेवक घनश्याम पाटील याविरुद्ध जिल्हाधिकार्यांनी एमपीडीए प्रस्तावावरून स्थानबद्धतेचे 15 फेब्रुवारी 2017 आदेश दिले होते. मात्र, त्यापूर्वीच तो फरारी झाला होता. याबाबत पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांचे एक पथक नेमण्यात आले होते. त्या पथकाने घनश्याम पाटीलचा विविध ठिकाणी शोध घेतला. या दरम्यान घनश्यामने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती.