अमळनेरात काळ्या बाजारात विक्रीस जाणारे धान्य पकडले

0

अमळनेर। शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातील धान्यादी काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जाणारे वाहन पकडण्यात आले असून सहा जणांवर अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगाराला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये घबराट पसरली आहे.

आरोपीना दोन दिवस कोठडी
अमळनेर-चोपडा रोडवरील दहिवद फाट्याजवळ स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पंकज पाटील व शिवाजी पारधी यांनी दिल्यानंतर तहसिलदार प्रदीप पाटील, पुरवठा अधिकारी राजेंद्र साळुंखे, पी.एन.बोरसे यांच्यासह अधिकार्‍यांनी यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. एम.एच.19. एस.3367 या पिक अप वाहनाने अमळनेर येथे बाजार समितीत विक्रीसाठी 40 गोण्या माल विक्रीसाठी येत होता. सोनखेडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा हा माल असल्याची कबुली वाहनचालक फारुख रशीद खाटिक यांनी दिली. विजू सिंधी व त्यासोबत एक अनोळखी इसम यांनी गाडीमालक शकील बिस्मिल्ला खाटिक यांना कल्पना देऊन माल घेऊन या असे सांगितले होते अशी माहिती यावेळी चालकाने दिली.

वाहन ताब्यात
वाहन तहसील विभागाने ताब्यात घेतले असून स्वस्त धान्य दुकानाची चौकशी केली असता घरी आढळून आले नाही.
स्वस्त धान्य दुकानातील 7 हजार किंमतीचे साखर, 16 हजाराचे गहू, 1600 रुपयाचे तांदूळ, 5 हजार 500 रुपयाचे ज्वारी, 1200 रुपयाचे मका, 1 लाख 50 हजार रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. 1 लाख 81 हजार 300 रुपयांच्या माल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक फारुख रशीद खाटिक, पिंटू चौधरी, विजय तोलाणी, वाहन मालक शकील खाटिक, दुकानदारा विरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय उदयसिंह साळुंखे हे करीत आहेत.