अमळनेरात बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे आगमन

0

अमळनेर। श्री संत सखाराम महाराजांचे परमशिष्य बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे शुक्रवारी अमळनेरात आगमन झाले. बेलापूरकर महाराजांचे आगमन म्हणजे प्रतिपंढरपुरात पांडुरंगाचे आगमन झाले असे मानण्यात येते. बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरूष मोहन महाराज हे परंपरेप्रमाणे 4 रोजी अमळनेरात दाखल झाले होते. 5 रोजी वाडी संस्थानचे 11 वे गादी पुरूष प्रसाद महाराज यांनी शहराची वेशी गाठली. प्रसाद महाराजांनी बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे स्वागत केले. गुरूने शिष्याचे स्वागत करण्याची ही अनेक वर्षाची परंपरा आहे. तेथे दोन्ही महाराजांचे पाद्य पुजा करण्यात आली. त्यानंतर दोन्ही बैलांनी जुंपुलेल्या ‘शिग्राम’मध्ये आसनस्थ झाले. मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बोरी नदीपत्रात उतरली दिंडी
पहिली पान सुपारी आर.के.नगरच्या गणपती मंदिरात झाली. त्यानंतर दोन-तीन ठिकाणी पान सुपारीचा कार्यक्रम झाला. विजय मारुतीचे दर्शन घेतल्यावर बसस्थानक, पाचपावली, दगडी दरवाजामार्गे दिंडी सकाळी 10 वाजेच्या सुमारास बोरी नदीपात्रात उतरली. संत सखाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन महाराजांनी घेतले. प्रवेशाचा अभंग म्हणत बेलापूरकर महाराजांची दिंडी पैल तिरावरील तुळशीबागेत रवाना झाली. बेलापूरकर महाराजांची दिंडी सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास करीत अमळनेरात दाखल होत असते. संत सखाराम महाराजांचे परम शिष्य श्री शाहू महाराज बेलापूरकर हे दरवर्षी पंढरपुरला वारी करायचे. त्यांच्या स्वप्नात पांडुरंग आले होते. त्यांनी बेलापूरकर महाराजांना दृष्टांत दिला की, वैशाखात मी अमळनेरात असतो. त्यामुळे दरवर्षी बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरूष वर्षातील 11 वा:या पंढरपुराच्या करतात व 12वी वारी अमळनेरला करतात.