अमळनेर। तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे बर्याच रस्त्यांची दुरावस्था झाली असून पावसाळा सुरू होऊन ही किरकोळ व मोठ्या दुरुस्त्या संबंधित विभागाकडून न झाल्यामुळे त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. तर काही मोठ्या वळणार सूचना फलक नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. अमळनेर धुळे मार्गावरील नवलनगरपर्यंत मार्गाची देखभाल सा.बां. विभागाकडे आहे. परंतु सा.बां.विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. फलकाची दुरुस्ती करणे किंवा त्याठिकाणी नवीन फलक लावण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
फलक नसल्याने रात्री अपघाताची शक्यता
तालुक्यातील प्रमुख मार्गावर नाल्यांवर लहान पुलाचे बांधकाम केलेले आहे. पण बर्याच लहान पुलांवर कठडे व वाहन धारकांना सूचित करण्यासाठी रेडियमचे फलक लावले नसून काही पुलावर एक ते दीड फुटाचे कठडे बांधलेले आहेत. रात्री अंधारात बर्याच वेळेस मोटरसायकल स्वार व मोठे वाहन रस्त्याच्या कडेला उतरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी रेडियम लावून रात्री वाहन धारकांना सूचित होईल, असे फलक लावणे गरजेचे आहे. तसे न केल्यास एखादा मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमळनेर-शिरपूर मार्गावर विविध छोटया नाल्यावर पुलाचे बांधकाम झालेले आहेत. त्याठिकाणीही कठडे बांधण्याची आवश्यकता आहे तर झाडी गावालगत एक मोठा नाला गेलेला असून त्याठिकाणी बांधण्यात आलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने वाहने जावू शकत नाहीत. अशा परिस्थिती जर रात्री जोरदार पाऊस झाला, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने एखादा मोटरसायकल चालकाने जर पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला तर मोठा अपघात होऊन जीवित हानी होवू शकते.