अमळनेरात शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी कॉग्रेसतर्फे निवेदन

0

अमळनेर। शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवार 6 जून रोजी दुपारी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य जनतेला विकासात्मक अशी खूप आश्वासने दिली होती, मात्र भाजपा सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले तरी मात्र एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. विविध घोषणाकरत पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले अवाजवी भाव वाढ केली. जनधन योजनेतून सर्वसामान्य जनतेची बँकेत खाती उघडवली मात्र त्याचा फायदा कोणालाच झाला नाही, मुद्रा लोण योजना आणली मात्र एकही सामान्य माणसाला त्यातून कर्ज मिळाले नाही, शेतकर्‍यांना पूर्णवेळ वीजपुरवठा करणार असे सांगून दिशाभूल केली. शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव नसल्याने आत्महत्या वाढल्यात, नोटा बदलवून काळा पैसा बाहेर काढणार असे भासविले मात्र त्यातून फक्त सर्व सामान्य जनता वेठीस धरली गेली, कापसाला योग्य भाव मिळाला नाही, अच्छे दिनचे स्वप्न सर्व सामान्य जनतेला दाखविले मात्र त्यासाठी काहीच कृती केली नाही, या असंख्य पोकळ आश्वासने केंद्र व राज्य सरकारने दाखविली आश्वासनाची गाजर दाखवून तीन वर्षे पूर्ण झालीत प्रत्यक्षात मात्र काहीच परिणाम दिसत नाही या अकार्यक्षम सरकारचा आम्ही निषेध करतो असे निवेदनात म्हटले आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील, सचिव डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीपभैय्या पाटील, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस पराग पाटील, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी सुलोचना वाघ, प्रदेश प्रतिनिधी रामभाऊ संदानशिव, शहराध्यक्ष माधुरी पाटील, नामदेवराव पाटील, माजी नगरसेवक, हाजी मिस्त्री, धनगर पाटील, शांताराम ठाकूर, अमोल माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.