अमळनेर आगारातील बसेसची दुरवस्था

0

अमळनेर । अमळनेर बस आगारातील बसेसची दुरावस्था झाली असून बसेसमुळे ग्रामीण भागातील प्रवास करणारे विद्यार्थी व प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. अमळनेर आगाराच्या सेवेत असणार्‍या निम्याहुन अधिक बसगाड्याची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात त्या गळतात तर बर्‍याच बसेसच्या खिडक्या तुटलेल्या असून त्यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. दरम्यान बसमध्ये आगारातर्फे तुटलेल्या खिडक्या बसविणे गरजेचे असतांना अमळनेर आगारातर्फे मोठा गाजावाजा करत वाय-फाय बसविला आहे. मात्र बसेसला खिडक्या नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रवाश्यांकडून सुविधासाठी ओरड
ग्रामीण प्रवाशांकडूनच एसटीला जादा उत्पन्न मिळते, मात्र दुर्दैव असे की याच प्रवाशांना सुविधा दिल्या जात नाहीत, हे वास्तव आहे. राज्यभर सेवा देणारे एसटी महामंडळ हे आधुनिक होत प्रवाशांना एसटीत प्रवास करणे करमणूक ठरावे ह्या साठी एसटी प्रत्येक बसमध्ये मोफत वायफाय सेवा देत आहे. प्रवाशांनी एसटीकडे आकर्षित होण्यासाठी शिवनेरी, व्होल्वो सारख्या एसी व आरामदायी बसेस प्रवाश्यांच्या सोयी साठी दाखल केल्या आहेत.

काळानुरूप बदल करण्याची मागणी
दिवसेंदिवस एसटी काळानुरूप प्रवाश्याच्या सेवेसाठी हे ब्रीद वापरून बदल करीत असतांना अमळनेर आगार मात्र खटारा झालेल्या बसेसनेच प्रवाश्याची सेवा करीत आहे. बसमध्ये प्रवास करतांना वाय फाय बसवून मनोरंजन करण्यापेक्षा तुटलेल्या खिडक्या जर बसविल्या तर प्रवाश्याचे हाल होणार नाहीत आणि प्रवाशांना विविध समस्या भेडसावणार नाही अशी मागणी होत आहे.

बसेसला खिडक्या नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल
राज्य परीवहन मंडळातर्फे बसेच्या तिकीटात भरमसाठ वाढ करूनही प्रवाशांना अपेक्षेप्रमाणे सोयी-सुविधा मिळत नसल्याची प्रवाशांमधून ओरड होत आहे. अनेक बसगाड्यांमधील खिडक्या मागे-पुढे सरकत नाहीत. त्या ‘लॉक’ झालेल्या आढळल्या. तर काही बसगाड्यांच्या खिडक्या तुटलेल्या होत्या. या नादुरूस्त खिडक्यांमुळे पावसाचे पाणी आत येते आणि प्रवाशांना भिजावे लागते. सद्या हिवाळा सुरु आहे आणि ज्या गाड्यांच्या खिडक्या तुटलेल्या आहेत त्या ग्रामीण भागात रात्री मुक्कामाच्या फेर्‍या मारत असतात. रात्री हि वातावरणात गारठा असतो तर सकाळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ह्याच बसेसवर सकाळी प्रवास करीत असतात परंतु थंडीच्या दिवसात गाड्यांना खिडक्याच नसल्याने त्या विद्यार्थी व प्रवाशांना थंडितच प्रवास करावा लागत असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो ग्रामीण भागात जाणार्‍या बसगाड्या तर नेहमीच कुठल्या ना कुठल्या समस्येत अडकलेल्या आहेत.