जम्बो नोकर भरती डोळ्यासमोर ठेवून अनेक उमेदवार रिंगणात
अमळनेर । जितेंद्र ठाकूर
स्वातंत्र्य सेनानी व शिक्षक पू. सानेगुरुजी यांच्या पावणकार्यस्पर्शाने, श्रीमंत प्रताप शेटजींच्या दातृत्वाने, प्रताप महाविद्यालयाच्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली संस्था म्हणून खान्देश शिक्षण मंडळ ओळखली जाते!. मात्र संस्थेच्या मागील काही निवडणुकांपासून पैशाच्या व जाती पातीच्या नावाने होणार्या खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकींमुळे व संचालकांच्या आर्थिक वाटाघाटीतून होणारे जाहीर वादविवादांमुळे शिक्षण क्षेत्रातील संस्था कुप्रसिद्ध झाली आहे. संस्थामध्ये अनेक जुने नवे चेहरे तथाकथित संस्था विकासाचे मुद्दे घेऊन सभासदांजवळ जात आहे. संस्थाहितापेक्षा स्व:हितामध्ये गुरफटलेले संचालक बदनाम नक्कीच आहेत.मात्र अर्थपूर्ण प्रयत्नांनी पुन्हा पुन्हा निवडून येण्यातही माहीर झालेले आहेत. या संस्थेचे सभासद हि वर्षानुवर्षे विकासाच्या नावाखाली होणार्या अर्थपूर्ण निवडणुका अनुभवत आहेत. तोच तो पणा आणि काम चांगले करण्याचा बडेजावपणा मिरवत निवडणुकीनंतर संचालकपदाचा गर्व काही निवडून आलेल्या उमेदवारांच्या अख्या परिवारावर चढलेला दिसतो. सभासदही कोणत्या न कोणत्या उमेदवाराचा समर्थक असतो आणि असा उमेदवार ही कोणत्यातरी पॅनलला सामिल आहेत. परंपरागत पॅनलचे उमेदवार नेहमी निवडून आल्यावर इकडून तिकडे जातात. सर्व एक होतात.आणि भाईगिरी करत दादागिरी करतात. अर्थाने निवडणे आणि निवडून आल्यावर खरा अर्थ आहे, अशी धारणा घेऊन उमेदवार निवडणुकीत अमाप पैसा खर्च करतात तसा अमाप पैसा कमावतातही!
खान्देश शिक्षण मंडळाच्या अनेक प्राथमिक, माध्यमिक, स्वतंत्र मुलींच्या प्राथमिक ते माध्यमिक शाळा, महाविद्यालय, डीफार्मसी, संगणक शास्त्र इथपर्यंत मर्यादित विस्ताराचा पण नावलौकिक असलेला गौरवपूर्ण भूतकाळ व वर्तमान आहे. बंद पडलेले विधी महाविद्यालय, संस्थेच्या विस्तारासाठी जमिनी असूनही कोणताही विस्तार विकास करण्यास असमर्थ ठरलेले कार्यकारिणीचे कार्यकाळ संस्थेत फेरफटका मारल्यास डोळ्यासमोर येतात. पुणे विद्यापीठातील नावाजलेले महाविद्यालय म्हणून कधीकाळी ओळखले जाणार्या महाविद्यालयाच्या पुढे जिल्ह्यातच अनेक संस्था निघून गेल्या आहेत.
आज जळगांव धुळे नंदुरबार इतका मर्यादित क्षेत्रातही अनेक नविन संस्थांशी खान्देश शिक्षण मंडळाला स्पर्धा करावी लागतेय. एकेकाळी खान्देशातील विद्येचे मंदिर असलेले प्रताप विद्या मंदिर, माध्यमिक शाळा आज घरघर लागली आहे. अनेक संचालकांना संस्थेच्या भविष्यासाठी काही देणे घेणे नसल्याने संस्था स्वायत्त व परिपूर्ण विकसित होण्यात अयशस्वी ठरली आहे. संस्थेच्या कालानुरूप न झालेल्या प्रगतीला म्हणजेच अधोगतीला मागील काही काळापासून असलेले अनेक संचालक जबाबदार आहेत. विकास व अर्थपूर्ण व्यवहाराशी सांगड घालण्याची मनीषा ठेवणारे संचालक एकाकी पाडले जातात. काही उच्चशिक्षित या जाणकार संचालक संस्थेत निवडून येतात त्यामुळे सामन्यात संस्थेच्या मंडळाबद्दल व्यक्तिसापेक्ष आदर शिल्लक राहतो. अन्यथा नगरपालिकेच्या निवडणुकांसारखी निवडणूक आज ज्या संस्थेत होते तिथे निवडलेल्या संचालकांना अपवाद वगळता नगरसेवकांइतकीही किंमत अमळनेरात मिळत नाही अशीही परिस्थिती आहे.
आजच्या निवडणुकीत प्रस्थापित पॅनल फुटल्याच्या चर्चेने सर्वच उमेदवार अपक्ष उमेदवारासारखे सैरवैर होण्याच्या मनस्थितीत आहेत.प्रत्येकजण आपआपली यंत्रणा घेऊन सभासदांना ’लक्ष्मीदर्शन’ देण्यासाठी सज्ज आहे. अर्थ” पूर्ण होणार्या घडामोडी अनेक ’अर्थाने’ बोलक्या आहेत. भविष्यात संस्थेतील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे आणि यानिमित्ताने होऊ घातलेली जम्बो नोकर भरती डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक उमेदवार लढत आहेत.लावलेला माल निघण्याची पूर्ण खात्री सल्याने यंदा मतांचा बाजार जोरात होईल यात शंका नाही. जातीनिहाय, गांव निहाय, वार्ड निहाय, नेतेनिहाय याद्यांचे नियोजन ’अर्थ’ पूर्ण झालेले असून सभासद संबंधित वाटपाच्या याद्यांमध्ये आपले नांव असल्याची खात्रीही करून घेत आहे. एखाद्या उमेदवारासाठी पक्की यादी उमेदवाराचा समर्थक तयार करतोय आणि दुसर्या उमेदवारासही झेरॉक्स यादी देऊन इतरांकडेही डाळ शिजतेय का म्हणून चाचपणी करून घेतांना आढळतो. खान्देश शिक्षण मंडळ संचालक निवडणुकीत कार्यकरणीच्या 8 संचालक पदाशिवाय इतर पदांना फारशी किंमत नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त हि शोभेची देखावाची पदे म्हणून संचालकांनी ठेवली आहेत. संस्थेच्या आर्थिक व निर्णायक व्यवहारांमध्ये या नामधारी पदांना महत्व नसल्याने सभासद ही शेवटच्या दोन दिवसातील घडामोडींमध्ये या उमेदवाराकडे जास्त लक्ष देत नाही.