अमळनेर। राज्य व राष्ट्रीय महामार्गावर सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पाचशे मीटर अंतरात दारूविक्रीस बंदी घातली. त्याप्रमाणे सर्वत्र आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. महामार्गावरील पाचशे मीटरच्या आत असलेल्या मद्य विक्रीची दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. आता मद्य विक्रेत्यांनी अनोखी शक्कल लढविली असून अमळनेर तालुक्यात किराणा दुकान, चहाची दुकाने, स्वच्छतागृहात चोरट्या पध्दतीने दारु विक्री सुरु केली आहे. त्यामुळे दारु बंदी करुन काहीही फायदा होतांना दिसत नसल्याचे चित्र आहे. दारू दुकानासाठी महापालिकांकडे राज्यमार्ग वर्ग करू नका म्हणून प्रयत्न सुरू आहेत. रस्ते हस्तांतर होणे अथवा न होणे हा पुढचा विषय असला तरी सध्या सर्रासपणे चोरट्या मार्गाने दारूची विक्री केली जाते. ज्या ठिकाणी दारु विक्री सुरु आहे त्या ठिकाणी दोन आठवडे प्रचंड गर्दी दिसून येत होते. चोरट्या मार्गाने दारु मिळू लागल्याने गर्दी कमी झाल्याचे दिसते. याकडे दारुबंदी विभागाने दुर्लक्ष केले आहे.
जादा दराने विक्री: पाचशे मीटर अंतरातील दारू दुकान, बीअर बार बंद झाल्यानंतर आता बेकायदा देशी, विदेशी दारू विक्री करणारे अनेक जण व्यवसायात उतरले आहेत. परंतु आता छुप्या मार्गाने महामार्गावर मद्य विक्री सुरू झाली आहे. मद्य विक्रेते जादा दराने दारु विक्री करीत आहे.
राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटर अंतरात दारूविक्री बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दारू विक्री सुरु असल्याने हा न्यायालयाचा अवमान असल्याचे बोलले जात आहे.