अमळनेर तालुक्यात ६० कि.मी.रस्त्यांच्या कामांना गती

0

धरणगाव, बेटावद व धुळे रस्त्यांचे भाग्य

अमळनेर – हायब्रीड अन्युईटीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या १९२ कोटींच्या कामाला अतिशय वेगात सुरुवात झाली आहे. यामाध्यमातून म्हसले – अमळनेर व अमळनेर – बेटावद रस्त्यावरील भिलाली जवळील बाह्मणे फाटा तसेच अमळनेर ते नवलनगर अश्या एकूण ६० किलोमीटरच्या रस्ताचे काम प्रगतीपथावर आहे आहे. एवढेच नव्हे तर शहर हद्दीत दुभाजकासह विद्युतीकरण व सुशोभीकरन केले जाणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. आमदार शिरीष चौधरी यांनी या कामांसाठी पाठपूरावा केला होता. पहिल्या टप्प्यात म्हसले, टाकरखेडा, कुऱ्हे, अमळनेर, गलवाडे, जैतपिर, भोरटेक, चौबारी, पाडसे, एकलहरे, एकतास, भिलाली फाटा, ब्राम्हणे फाटा यागावातील रस्त्यांसाठी १५५ कोटी ४८ लाख मंजूर झाला आहे. प्रत्यक्षात या निधीतून ६० किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण होणार असला तरी त्यापैकी तालुक्यातील ४० किलोमीटर असून कामाची किंमत १०३ कोटी ६० लाख रुपये आहे. विशेष म्हणजे या कामात रस्त्याची लांबी ७ मीटर असल्याने एकाच वेळी दोन वाहने धावू शकतील असा विस्तीर्ण रस्ता होत आहे.

धुळे रस्त्याचे कामही वेगाने सुरु
आमदार चौधरींच्याच प्रयत्नाने अमळनेर ते नवलनगर या रस्त्याचेही भाग्य उजळले असून हायब्रिड ऐन्यूईटी अंतर्गतच मेहेरगांव धुळे अमळनेर चोपडा रस्ता, नवलनगर ते अमळनेरपर्यंतचा १९.५० किमी रस्ता डांबरीकरण व शहरालगत सुशोभीकरण करणे या कामासाठी सुमारे 89 कोटी निधी मंजूर असून.या रस्त्याचे काम देखील वेगात सुरु आहे. या रस्त्यावरील कामाचे क्षेत्र चोपडाइ कोंढावळ, डांगर, जानवे, मंगरूळ, लोढवे फाटा, अमळनेर असे आहे. दरम्यान सदर कामांतर्गत एकूण लांबीपैकी अमळनेर शहरात व शहर हद्दीत 850 मिटर दुभाजकासह विद्युतीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे आ.चौधरी यांनी सांगितले. हे सुशोभीकरण ताडेपुरा रास्ता, बेटावद रस्ता व धुळे रस्त्यावर होईल,याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला योग्य ठिकाणी 1.5 मिटर चे पेव्हर ब्लॉक व त्यापासून एक मिटर साईड पट्टी, असे एकूण 12 मिटर काम होईल, चालण्यासाठी काही ठिकाणी फुटपाथ असेल अडचणीचे पथदिवे काढून योग्य ठिकाणी लावले जाणार आहे.