अमळनेर। पाण्याचा वापर काटकसरीने व्हावे यासाठी अमळनेर नगरपालिकेतर्फे नगरपालिका क्षेत्रातील, क्षेत्राबाहेरील घरगुती व व्यावसायिक प्रयोजनासाठी नळाला वॉटर मिटर बसविण्याचा निर्णय सोमवारी 15 मे रोजी होणार्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर चौथ्या क्रमांकावर हा विषय आहे.
मात्र सदरील निर्णय नागरिकांसाठी कशी फायद्याची आहे. हे समजुन सांगावे अशी मागणी करण्यात येत असून आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीच्या नगरसेवक या निर्णयाला विरोध दर्शवित आहे. अमळनेर नगरपालिकेतर्फे काही भागात 10-12 तास सलग पाणी पुरवठा होतो तर काही भागात 3-4 तासच पुरवठा होता. काही ठिकाणी तर 1 तासच पाणी पुरवठा होतो. कोणत्या भागात पाणी वाया जाते त्यावर उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी 1 हजार 800 रुपये पाणीपट्टी आकारुन जनतेला अडचणीत आणले आहे. पुन्हा नागरिकांना अडचणीत आणले जात असल्याचे आरोपही त्यांनी केले आहे. या निर्णयाच्या विरोधात आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीच्या नगरसेवक सभागृहाबाहेर विरोध करणार असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.