अमळनेर बसस्थानकाच्या आवारात होणार भाजीपाला लिलाव

0

अमळनेर-कोरोनामुळे राज्यात झालेल्या लॉकडाऊन मुळे एस टी बसची चाके थांबून काही दिवसांपासून अमळनेर बसस्थानकाचे आवार निर्मनुष्य झालेले असताना हे आवार उद्यापासून सकाळी पुन्हा गजबजलेले दिसणार असून याठिकाणी भाजीपाला लिलाव करण्याचा निर्णय पालिका व महसूल प्रशासनाने घेतला आहे.सोशल डिस्टनसिंगचा उद्देश सफल होण्यासाठीच या जागेची निवड करण्यात आली आहे.


कोरोनामुळे साऱ्याच बाबींची चक्रे उलटसुलट झाली असून यात प्रामुख्याने अमळनेर येथील भाजीपाला लिलाव मार्केटचे कामकाज खूपच अडचणीत आले आहे.विशेष म्हणजे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तुत भाजीपाल्याचा समावेश असतानाही या बाजाराची घडी विस्कटली आहे,यास प्रमुख कारण म्हणजे लिलाव करताना बाजारात होणारी गर्दी आणि त्यामुळे सोशल डिस्टनसिंग चा होणार भंग.या प्रमुख कारणामुळे येथील भाजीपाला अडत असोसिएशनने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा माल परस्पर किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी करावा आणि विक्रेत्यांनी ठिकठिकाणी तो विकावा असे जाहीर केले होते.