अमळनेर । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत असंख्य गाळे व दुकानांचे निर्माण होत असल्याने हि बाजार समिती खरेदीचा नवा पॉईंट ठरून नवी बाजारपेठ याठिकाणी साकारेल, असा विश्वास सभापती उदय वाघ यांनी मार्केट आवारातील गोडाऊन 1 ते 5 मधील 48 व्यापारीं गाळ्यांचा जाहीर लिलाव प्रसंगी व्यक्त केला. लिलाव प्रक्रियेस मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा प्रयोग यशस्वी ठरला असून यामुळे मार्केट च्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.
गाळेलिलावातून 1 कोटी 14 लाख
लिलाव प्रक्रिया पार पडून सर्वाधिक बोली लावणार्यास हे गाळे देण्यात आले. सभापती उदय वाघ व संचालक मंडळाच्या निर्णयानुसार शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या अथवा शेतकरी हितासाठी काम करणार्या अन्य घटकांना हे गाळे घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाल्याने अनेकांनी डिपॉझिट भरून लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. प्रत्येक गाळ्यासाठी अपसेत किंमत 5.25 लाख ठेवण्यात आली होती. त्यापेक्षा जास्त बोली लावणार्यास तीनवार करून गाळे देण्यात आले. यातील एका गाळ्यास सर्वाधिक 9 लाख 81 हजार किंमत मिळाली तर उर्वरित गाळ्यांना देखील अपेक्षेपेक्षा अधिक किंमत मिळून एकूण 14 गाळ्यांचा लिलाव झाला. सुमारे 1 कोटी 14 लाख एवढया भरघोस किमतीत हे गाळे गेले.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपसभापती अनिल अंबर पाटील, मार्केट संचालक सुरेश पिरन पाटील, पावभा पाटील, शिवाजी गोसावी,हरी भिका वाणी, प्रफुल पवार, पराग पाटील, महेंद्र श्रीराम पाटील, सचिन बाळू पाटील, महेश देशमुख, शंकर बीतराई,भगवान कोळी,राहुल पाटील,बंडू पाटील यासह व्यापारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.लिलाव प्रक्रियेसाठी सचिव डॉ उन्मेश राठोड, सहसचिव गोसावी,यासह कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले
लवकरच काँक्रीटीकरण
राहिलेल्या गाळ्यांच्या बाबतीत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. लिलावाची प्रक्रिया मार्केट संचालक उदय नंदकिशोर पाटील यांनी पार पाडली. यावेळी सभापती उदय वाघ यांनी सांगितले कि पारदर्शक पद्धतीने लिलावा द्वारे हि दुकाने शेतकरी व शेती संबधित व्यावसायिकांना दिली जात आहेत.