अमळनेर येथे वकीलांना कापडी पिशवीचे वाटप

0

अमळनेर । प्लॅस्टीकमुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले आहे. प्लॅस्टीक हा पदार्थ दिर्घ काळ विघटीत होत नाही त्यामुळे पर्यावरणाची हाणी होत चालली आहे. प्लास्टीक पिशव्यांचा वापर बंद व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे (नवी दिल्ली) अमळनेर तालुका वकील संघाच्या पदाधिकार्‍यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे जो उपक्रम राबविला जात आहे, तो अतिशय कौतुकास्पद आहे. यासाठी नागरिकांनी प्लास्टिक कॅरिबॅगांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. मुखर्जी यांनी केले. पर्यावरणाच्या हानीमुळे ओझन वायूचा थर कमी होत चालला असून भविष्यात सूर्याचे अतिनील किरणांमुळे त्वचा रोगाचे प्रमाण वाढणार आहे. यावर मात करावयाची असेल तर प्रत्येकाने आताच जागृत होणे गरजेचे आहे. कापडी पिशवीचा वापर केल्याने पर्यावरणाचे संतुलन साधले जाऊ शकते. असे मत यावेळी प्रा. डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केले.

समितीचे राज्यभरातील सात जिल्ह्यात कार्य
समितीचे कार्य महाराष्ट्रांसह सात राज्यांमध्ये सुरू आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देणे, मधुमक्षिका पालन करण्यासाठी कार्यशाळा, महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून शिलाईन मशीन वाटप, सौर ऊर्जेवर आधारित शेगडींचे वाटप, गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांसाठी शक्ती विजय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आदींसह विविध उपक्रम राबविले जात आहेत. सूत्रसंचालन व आभार उमेश काटे यांनी केले. यावेळी अध्य अँड. ए. एन. बोरसे अध्यक्षस्थानी होते. सरकारी अभियोक्ता अँड. शशिकांत पाटील, तालुका वकील संघाचे सेक्रेटरी अँड.सलिम खान, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत बडगुजर, डी. बी. पाटील, बाजार समितीचे संचालक एच. एस. पाटील, प्राचार्य पी. एम. कोळी, विनोद पाटील, प्रवीण पाटील आदींसह वकील संघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.