अमळनेर-होळ नव्या रेल्वे मार्गाची सुरक्षा चाचणी

0

अमळनेर । अमळनेर ते होळ दरम्यान तयार झालेल्या नव्या रेल्वे मार्गाची सुरक्षा चाचणी बुधवारी घेतली. रेल्वेचे सुरक्षा विभागाचे आयुक्त सुशील चंद्रा यांच्या पथकाने 11 मोटार ट्राली घेऊन होळ स्टेशनपासून अमळनेरपर्यंतची तपासणी केली. पथकाने रेल्वे मार्गावरील पूल, रुळाचे सांधे, चाव्या, फाटक, रेल्वेच्या विद्यूत तारा, स्टेशन, बोगदे, सिग्नल, सुरक्षेचे उपाय यांची सूक्ष्म तपासणी केली. या पथकाने नवीन मार्ग प्रवाशी गाडी धावण्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही यांची कसून तपासणी केली. सुरक्षा चाचणीसाठी आलेले पथक त्यानंतर विशेष रेल्वे गाडीने ताशी 120 किमी वेगाने जाणार्‍या गाडीने पुन्हा याच मार्गाने सुरतकडे रवाना झाले. दरम्यान, रेल्वेचे अधिकारी येणार असल्याने स्टेशन चकाचक केलेले होते. नवीन प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लॉन तयार करण्यात आले. त्यात अधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

स्टेशनरेल्वे सल्लागार समितीतर्फे दिले निवेदन
अमळनेर येथे नवीन आणि जुना प्लॅटफार्म समांतर असावेत. तिकीट कार्यालय मध्यवर्ती भागात पाहिजे, रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता ग्रामीण रुग्णालयातून जाणारा असावा, रुळाच्या दोन्ही बाजूला प्रवाशी प्रतिक्षालय असावे, वयोवृद्धांसाठी रॅम्प असावा, कार्यालयीन कर्मचारी स्टॉफ पुरेसा असावा, पार्किंग सुविधा, मॉडेल स्टेशनच्या सुविधा निर्माण कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन डीआरएम मुकुल जैन यांना स्टेशन रेल्वे सल्लागार समितीने दिले. निवेदनावर प्रितपालसिंग बग्गा, जुलाल पाटील, हरचंद लांडगे, दिलीप जैन, जय कोठारी, निर्मल कोचर, भरतसिंग परदेशी, विलास पवार आदी उपस्थित होते. रेल्वेसुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा, उपआयुक्त गर, मुख्य व्यवस्थापक ए.के. गुप्ता, डीआरएम मुकुल जैन, वरिष्ठ अभियंता राजेश कुमार, कार्यकारी अभियंता वाघ, वरिष्ठ अभियंता जितेंद्र यादव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.