अमृतच्या पाईप लाईनची कामे तातडीने मार्गी लावा

0

नगराध्यक्ष रमण भोळे : शहरात अमृत योजनेची आढावा बैठक

भुसावळ- अमृत योजनेच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामांना वेग द्यावा तसेच रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही या पद्धत्तीने कामे करावीत, अशा सूचना नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मंगळवारी पालिकेत झालेल्या अमृतच्या आढावा बैठकीत केल्या. शहरात अमृत योजनेची कामे प्रगती पथावर सुरू असून रॉ वॉटर पंपींग स्टेशनबाबत नगराध्यक्षांनी आढावा घेतला. पंपींग स्टेशनचा आकार तीन ते चार मीटरने कमी करण्यासंदर्भात यापूर्वीच नाशिकच्या बैठकीत सूचना मिळाल्यानंतर त्याबाबतही आढावा घेण्यात आला तर तसेच रीव्हाईज प्लॅन तातडीने तयार करण्यासंदर्भात भोळे यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केली. पंपींग स्टेशनच्या कमी आकारामुळे मेन्टनन्सचा खर्च कमी होणार असून पंपाची क्षमतादेखील वाढणार आहे.

कंडारीकडील घाण पाण्याची समस्या सुटणार
तापीच्या बंधार्‍यात कंडारी गावाकडून येणारे सांडपाणी मिसळत असल्याने भविष्यात असे प्रकार होवू नये यासंदर्भात आढावा घेण्यात आला तसेच अमृत योजनेच्या कामातंर्गत ही समस्याही सोडवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगत त्यामुळे शहराचा पाणीसाठा सुरक्षित राहणार असल्याचे सांगितले. बैठकीला एमजीपीचे डेप्यु.इंजिनिअर पोहरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, प्रकल्पाधिकारी वाघ, जैन कंपनीचे कंत्राटदार, अधिकारी उपस्थित होते.