अमृतसर-पंजाबमधील अमृतसर येथे दशरानिमित्त आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या रेल्वे अपघातत ३२ सेकंदात ६१ जणांना जीव गमवावा लागला. संपूर्ण देश या घटनेमुळे हादरले होते. अमृतसर रेल्वे दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून, त्यात अपघातस्थळानजीकच्या दसरा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असलेल्या पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.
या अपघाताची चौकशी करण्यासाठी सरकारने जालंधरचे विभागीय आयुक्त बी. पुरुषार्थ यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमले होते. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करणारे एका काँग्रेस नगरसेवकाचे चिरंजीव, अमृतसर जिल्हा प्रशासनाचे तसेच महापालिका, रेल्वे आणि स्थानिक पोलीस यांच्या अधिकाऱ्यांवर या घटनेसाठी ठपका ठेवण्यात आला आहे.
काँग्रेसच्या नगरसेवकांचे पुत्र आणि सिद्धू दाम्पत्याचा जवळचा सहकारी सौरभ मिठू मदन याने कार्यक्रमस्थळी लोकांच्या सुरक्षेची निश्चिती करायला हवी होती, यावर अहवालात भर देण्यात आला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
कार्यक्रमाबाबत योजलेले सुरक्षेचे उपाय आणि या कार्यक्रमासाठी दिलेली परवानगी यासाठी अहवालात अमृतसर प्रशासन आणि महापालिका यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. रेल्वे मार्गावर प्रचंड मोठा जमाव असताना जलद गाडीला हिरवा सिग्नल दिल्याबद्दल रेल्वेच्या भूमिकेवरही अहवालात प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने या अहवालाशी संबंधित फाइल मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहे.