अमृतसर रेल्वे अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार – मुख्यमंत्री अमरिंदर सिंह

0

अमृतसर : रेल्वे अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून पुढील चार आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. अशी माहिती मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अमृतसर रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. रेल्वे अपघाताची दुर्घटना अत्यंत दुखद असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या ‘दुर्घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला असून 57 जण जखमी झाले आहेत. आम्ही लवकरात लवकर सर्व मृतदेहांचा पोस्टमॉर्टम होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. अद्याप 9 मृतदेहांची ओळख पटलेली नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिली आहे.

यावेळी त्यांना पत्रकारांनी उशिरा येण्याबद्दल जाब विचारला असता, ‘जेव्हा अशाप्रकारची दुर्घटना घडते तेव्हा संपूर्ण प्रशासन त्यात सहभागी होतं. आम्ही जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आलो आहोत. संपूर्ण मंत्रीमंडळ आज येथे उपस्थित आहे’, असंही अमरिंदर सिंह यांनी म्हंटले.