अमेरिकन डॉलरऐवजी कोरे कागद देणारी टोळी अटकेत

0

पकडलेले पाचही जण परप्रांतीय

पुणे : अमेरिकन डॉलर असल्याचे खोटे सांगून रुमालामध्ये पेपरचा बंडल देऊन फसवणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून सोनार अळी, हडपसर येथे अटक केली आहे. नाहीद अमिन रहमान (वर26, रा. पश्‍चिम बंगाल), हाफीझुल रुफीकुल सरदार (वर 23, रा. पश्‍चिम बंगाल), समोन अत्तीयर खलिफा (वर 31 रा. पश्‍चिम बंगाल), ओनिक फकरुल शेख (वर 29, रा. नॉर्थ वेस्ट दिल्ली), सैदुल उबेद शेख (वर 28, रा. नॉर्थ वेस्ट दिल्ली) अशी त्यांची नावे आहेत.

90 हजाराला घातला गंडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जागेच्या व्यहारासाठी 90 हजार एवढी रोख रक्कम घेऊन त्याबदल्यात अमेरिकन डॉलर असल्याचे खोटे सांगून रुमालामध्ये पेपरचा बंडल देऊन चारजण पळून गेले. ही घटना 18 ऑगस्टला हडपसर परिसरात घडली होती. या गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपी सोनार अळी, हडपसर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार सापळा रचून पाचही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना अटक करून त्यांचाकडून 104 अमेरिकन डॉलर्स , रूमालामध्ये गुंडाळलेला पेपरचा बंडल, 25 हजारांची रोकड, 5 मोबाईल असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याआधी केलेल्या गुन्ह्यांची कबुलीही आरोपींनी दिली आहे. आरोपींना न्यायलयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आलेली आहे.