इस्लामाबाद : अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणारा सर्व प्रकारचा संरक्षण निधी थांबवल्याने पाकची चांगलाच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मात्र, दहशतवादाला थारा यापुढे देणार नाही, अशी क्षमायाचना करण्याऐवजी पाकने अमेरिकेविरोधात गरळ ओकण्यास सुरूवात केली आहे. पाकने अमेरिकेच्या विरोधात जाहीर टीका सुरू केली आहे. अमेरिकेसाठी आम्ही खूप केले आता या देशासाठी पाकिस्तान आहुती देणार नाही, असे पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिका आणि पाकिस्तानची मैत्री सुद्धा संपल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
पुन्हा आहुती देणार नाही
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी द वॉल स्ट्रीट जरनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमेरिकेवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणारी संरक्षण मदत थांबवली. त्याच दिवशी आमचे आणि अमेरिकेचे मैत्रीचे संबंध संपुष्टात आले. अमेरिका आमच्या देशाचा वापर केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या फायद्यासाठीच करत होता. अमेरिका पाकिस्तानसाठी एक असा मित्र आहे, ज्याने फक्त आणि फक्त दगाच दिला. पाकिस्ताने अमेरिकेची अफगाणिस्तानात साथ देणे एक खूप मोठी चूक होती. आता पुन्हा अशी चूक करणार नाही. अमेरिकेसाठी पाकिस्तान पुन्हा आहुती देणार नाही असेही आसिफ यांनी स्पष्ट केले.
15 वर्षांत 33 अब्ज डॉलरची मदत
अमेरिकेने पाकला दिल्या जाणारा दहशतवादविरोधी निधी गेल्या आठवड्यातच थांबला. आता सर्वच प्रकारची संरक्षण मदत थांबवल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. त्यावरूनच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून पाकचा 7 हजार कोटींचा निधी थांबवण्यात आला आहे. यासोबतच गेल्या 15 वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला 33 अब्ज डॉलरची मदत केली. तरीही पाकिस्तानने अमेरिकेला दहशतवाद विरोधी कारवायांच्या नावे मूर्खात काढले, असे म्हणत ट्रम्प यांनी पाकला खडेबोल सुनावले होते.