अमोल यादवच्या स्वप्नाला भरारी, सरकारने केला 35 हजार कोटींचा करार!

0

मेक इन महाराष्ट्र विमानाचे स्वप्न पुर्ण होणार

मुंबई : भारतीय बनावटीचे विमान आता महाराष्ट्रात तयार होणार असून मराठमोळे कॅप्टन अमोल यादव यांचे स्वप्न अखेर पुर्ण होणार आहे. राज्य सरकारने त्यांच्याशी मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये करार केला आहे. 35 हजार कोटींचा हा करार असून यात अमोल यादव यांना पालघर जिल्ह्यात 157 एकरची जागा दिली जाणार आहे. विमान बांधणीच्या या उद्योगातून तब्बल 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

अंमलबजावणी करुन जागेचा ताबा द्यावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी अमोल यादव म्हणाले, आता राज्य सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करुन जागेचा ताबा द्यावा. कारखाना उभा करुन त्यामध्ये पहिले विमान तयार होण्याची प्रतीक्षा आहे. अमोल यादव यांचा महाराष्ट्रात सुरू होणारा कारखाना भारतातील पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असेल. 20 नोव्हेंबर रोजी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचे रजिस्ट्रेशन करुन घेतले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचे पत्र देण्यात आले होते. अमोल यादव यांनी तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या विमानाच्या प्रकल्पासाठी लागणारी 157 एकर जमीन देण्यासाठी या विमानाला नागरी विमान वाहतूक महासंचालकांचे (डीजीसीए) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असल्याने ते मिळविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत करार
अमोल यादव मूळचे सातार्‍याचे असून मुंबईत स्थायीक झाले आहेत. त्यांनी 1998 मध्ये थर्स्ट एअरक्राप्ट कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्यांचा पहिला प्रयत्न फसला. मात्र, त्यामुळे नाउमेद न होता यादव यांनी 2003 मध्ये दुसर्‍या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. अखेर तिसर्‍या प्रयत्नात 2009 मध्ये सहा आसनी विमाननिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला. यादव यांनी आता 19 आसनी विमानाची निर्मिती सुरू केली आहे. या प्रयत्नाची दखल घेत राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत यादव यांच्या कंपनीशी करार केला आहे. या करारासाठी अमोल यादव यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
वांद्रे- कुर्ला संकुलात भरलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात परवानगी नसतानाही यादव यांनी महत्प्रयासाने आपले विमान प्रदर्शनात मांडले. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या विमानाला मान्यता मिळण्याठी वर्षभर सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. यानंतर विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) यादव यांच्या विमानावर मान्यतेची मोहोर उमटवली होती.