अयोध्यत राम मंदिर नाही तोपर्यंत देशात ‘अच्छे दिन’ नाही

0

राष्ट्रीय संयोजक सोहन सोलंकी यांनी सावद्यात सभेत भरला हुंकार

सावदा/फैजपूर- देशात सध्या सबका साथ सबका विकास व अच्छे दिनची चर्चा आहे मात्र जो पर्यंत अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर निर्माण होत नाही तो पर्यंत अच्छे दिन येणार नाही, त्यासाठी सरकारने मंदिर निर्माणसाठी अध्यादेश काढावा, कायदा करावा ही देशाच्या सव्वाशे कोटी जनतेची मागणी व अस्मितेचा प्रश्न आहे, असे सांगत सावदा येथील भव्य सभेत बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक व प्रमुख वक्ते सोहन सोलंकी यांनी हुंकार भरला. सावदा येथील शासकीय विश्राम गृहाच्या समोरील भव्य प्रांगणात मंगळवारी भव्य हुंकार सभा झाली. राम मंदिर निर्माणला होणारा विलंब व न्यायालयाकडून मंदिर निर्माणला न देणारी प्राथमिकता यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी या हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले. देशभरात अशा चारशे सभा होणार आहे.

व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, शास्त्री भक्तीप्रकासदासजी महाराज, स्वरूपानंदजी महाराज, बजरंग दलाचे जिल्हा संघटक विनोद उबाळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सभेस माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजन, सुरेश धनके, पद्माकर महाजन यांच्यास अन्य मान्यवरांची व्यवस्था व्यासपीठाखाली स्वतंत्रपणे करण्यात आली.

सरदार पटेलांचे स्मारक मग राम मंदिर का नाही ?
यावेळी सोहन सोलंकी यांनी मनोगतात सरदार पटेल यांचे भव्य स्मारक साकारण्यात येते त्याचे निश्‍चितच अभिनंदन करतो मात्र सरदार पटेल यांनी जे कार्य केले तेच कार्य आज अपेक्षित होते. उच्च न्यायालयाला राम मंदिर निर्माचे कार्य ही प्राथमिकता वाटत नाही. हा आज समस्त हिंदू धर्माचा अपमान आहे. अन्य बाबतीत रात्री न्यायालय उघडून निर्णय घेतले जातात याचे दाखले देत श्रीरामाच्या मंदिरासाठी मात्र न्यायालय तीन मिनिटात सुनावणी आटोपते व राम मंदिर ही न्यायालयाची प्राथमिकता नाही असे सांगते या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी सोलंकी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत भारत हा कुणाच्या बापाचा नाही, भारत हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप व गुरुगोविंदसिंग यांचा आहे. यावेळी डिसेंबर 2010 मध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता की अयोध्येत श्रीरामाचे मंदिर होते व तसे उत्खननात सिद्ध झाले होते. तरीही या ना त्या कारणावरून मंदिर निर्माण करण्यास अडथळे येत आहे शोकांतिका आहे. केवळ मंदिराचा प्रश्न नाही तर हा शंभर कोटी भारत वासीयांचा स्वाभिमान व पूर्वजांच्या संकल्पाचा प्रश्न आहे.

महत्वाच्या विषयाला बगल -जनार्दन महाराज
महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी आजपर्यंत शिस्त पाडली म्हणून श्रीराम मंदिर निर्माणाची तारिख पुढे ढकली गेली. हिंदू धर्म हा आक्रमक झाला नाही संस्कृती व सहनशीलात त्यांच्या हृदयात आहे त्यामुळे कदाचित या विषयाला बगल दिली जाते, हा चिंतेचा विषय आहे. आजपर्यंत विनंती करूनसुद्धा न्यायालयाने प्राथमिकता दिली नाही या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. रामाचे चरीत्र समाजा समोर येण्यासाठी राम मंदिर निर्माण होणे गरजेचे असून समाजात हुंकार भरण्याची गरज आहे. भक्तिप्रकाशदासजी शास्त्री व स्वरुपानंद महाराज यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून सोहन सोलंकी यांना तलवार भेट दिली. प्रास्ताविक विहिपचे जिल्हा मंत्री योगेश भंगाळे तर सूत्रसंचलन विनोद उबाळे व आभार विक्की भिडे यांनी मानले. दरम्यान, आगामी 2019 च्या निवडणुकीत श्रीराम मंदिराच्या विषयावरून कुणाला लाभ होईल त्याच्याशी घेणे-देणे नाही मात्र श्रीरामाचे मंदिर व्हायला हवे, अशी भावनाही व्यक्त झाली. मोदी तुम्ही आमचे आहे तर राम मंदिर कराच, अशी एकमुखी मागणी व्यासपीठावरून करण्यात आली.