भुसावळातील प्रभाग क्रमांक सातमध्ये हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन
भुसावळ- शहरातील अयोध्य नगरातील रस्त्यांचे लवकरच डांबरीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. त्यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक सातमध्ये दोन हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार बोलत होते. सावकारे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात काही भागातील रस्त्यांचे डांबरीकरण मंजूर करण्यात आले असून दुसर्या टप्प्यातही लवकरच अयोध्या नगरासह अन्य भागातील रस्त्यांचे कामे होतील. नगरसेवक मुकेश पाटील यांच्या सामाजिक उपक्रमांचे प्रसंगी त्यांनी कौतुकही केले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, स्वरूप कॉलनी, अयोध्या नगर, मोरेश्वर नगर, ठोके नगर हे पालिकेच्या हद्दीत न येणार्या विस्तारीत भागातही अमृत योजनेची पाईप लाईन टाकण्यात आल्याने नागरीकांची पाण्याची समस्या सुटली आहे. अखेरच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी नगरसेवक मुकेश पाटील, सतीश सपकाळे यांच्यासह प्रभागातील नागरीक उपस्थित होते.