नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. यानंतर या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली.
अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी करणारी याचिका अखिल भारत हिंदू महासभेने दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी तातडीने होणे गरजेचे असल्याचे महासभेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मात्र त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. या प्रकरणात आपण आधीच आदेश दिलेले आहेत, असे म्हणत न्यायालयाने महासभेची याचिका फेटाळून लावली.