अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या पुतळ्यासंदर्भात आज घोषणेची शक्यता

0

लखनौ- अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्यासंदर्भात आज घोषणा करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून आज संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी तब्बल पाच हजार कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

शरयू नदीच्या तीरावर प्रभू रामचंद्रांचा 150 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा  योगी करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोरियाच्या राणीचं स्वागत करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, दोन हजार वर्षांपूर्वी अयोध्याच्या राजकन्येचं कोरियाच्या राजकुमाराशी विवाह झाला होता. दोन्ही देश ही वैभवशाली परंपरा पुढे नेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अयोध्या महापालिकेचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी सांगितले की अयोध्येमध्ये शरयूतीरावर प्रभू रामचंद्रांचा 151 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. योगी आदित्यनाथ यासंदर्भातील घोषणा आज करतील अशी अपेक्षा असल्याचेही उपाध्याय म्हणाले. सरकारी अधिकारी पुतळ्याच्या जागेसंदर्भात संशोधन करत असून जमिनीच्या चाचण्या करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत तुलसीदास घाटाच्या जवळपास दोन तीन जागांपैकी सर्वोत्कृष्ट असलेली एक जागा निश्चित करण्यात येईल असे उपाध्याय म्हणाले.