अरविंद एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली जगातील सात आश्चर्ये !

0

सांगवी : उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या, शोभेची फुले, तसेच फुलपाखरे, कारंजांचे तुषारे हे सर्व पाहून हरकून गेलेले विद्यार्थी… जगातील सात आश्चर्ये एकाच ठिकाणी पाहण्यातला आनंद आणि विद्यार्थ्यांना पडलेले विविध विविध प्रश्न व त्या माध्यमातून उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न…त्यांच्या निरागस प्रश्नांना शिक्षकांनी दिलेली समर्पक उत्तरे…आपणाला काहीतरी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहण्याजोगा होता.

निमित्त विकास सहलीचे
निमित्त होते, विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लीटल फ्लॉवर स्कूलच्यावतीने आयोजित सहलीचे. पहिली ते सातवीपर्यंतचे सुमारे 600 विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. ही सहल पुण्यातील पु.ल. देशपांडे उद्यान आणि स्व. यशवंतराव चव्हाण उद्यान या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी शाळेच्या शिक्षिका, तसेच कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत सहकार्य केले. यावेळी सोसायटीच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.

‘पुलं’ उद्यानाला भेट
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पु.लं. देशपांडे उद्यानातील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. हा सर्व अनुभव विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण होता. स्व. यशवंतराव चव्हाण उद्यानात असलेली सात आश्चर्ये पाहण्याचा, त्याविषयी कुतुहलतेने जाणून घेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न स्तुत्य होता. विद्यार्थ्यांनी भारतातला ताजमहल, पॅरिसचा आयफेल टॉवर, इजिप्तमधील गिझाचा भव्य पिरॅमिड, इटलीचा कोलासियम, ब्राझिलचा ख्राइस्ट द रिडीमर, अमेरिकेचा स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, चीनची भिंत.. ही जगातील सात आश्चर्ये जाणून घेतली. भारतातील महत्त्वाच्या वास्तूंचेही विद्यार्थ्यांना दर्शन झाले. हे सर्व पाहून संपूर्ण जगाचीच सफर झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर झळकत होता.याबाबत संस्थेच्या सचिव आरती राव यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विषयाच्या ज्ञान वाढीसाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यास मोठी मदत होत असते.