मुंबई । काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांवर दगडफेक करणार्यांना रोखण्यासाठी जवानांनी स्थानिक तरुणाऐवजी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनाच त्या जीपला बांधायला हवे होते, असे वादग्रस्त ट्विट अभिनेते आणि भाजपचे लोकसभेतील खासदार परेश रावल यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कराने दगडफेकीपासून वाचण्यासाठी एका युवकाला जीपच्या पुढे बांधून फिरवल्याची चित्रफीत गेल्या महिन्यात व्हायरल झाली होती. दगड फेकणार्यांपासून बचाव करण्यासाठी एका युवकाचा मानवी ढाल म्हणून उपयोग करण्यात आला होता. यावरच परेश रावल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील विरोधी पक्षनेते ओमर अब्दुल्ला यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता.
हा तर ओमर अब्दुल्लांचा सैन्याला बदनाम करण्याचा कट
व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच हा सैन्याला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर सैन्याकडून या व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली असता जीपला बांधण्यात आलेली व्यक्ती एक सामान्य विणकर असल्याचे समोर आले. फारुख अहमद दार असे नाव असलेला हा व्यक्ती त्याच्या बहिणीच्या अंत्यदर्शनासाठी तेथे गेला होता. 53 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीकडून हे कृत्य घडल्याची माहिती पुढे आली होती.
अभिनयाकडून राजकीय क्षेत्राकडे वळलेल्या परेश रावल यांच्या वादग्रस्त ट्विटवर अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनीही प्रतिकिया दिली. ‘पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भारतीय जनता पक्षाची युती प्रत्यक्षात आणणार्या त्या व्यक्तीला का नाही जीपला बांधत?’ असा सवाल सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या ट्विटला रावल यांनी अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
त्यांच्या भूमिकेवर अनेकांना आक्षेप
काश्मीरमधील मानवी हक्कांबद्दल अरुंधती रॉय यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या भूमिकेवर अनेकांना आक्षेप आहे. 1997 साली अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंगस या कादंबरीला बुकर पारितोषिक मिळाले आणि हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले. काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मिरी युवकाला जीपला बांधल्याचा व्हिडिओ आणि फोटो ट्विट करून काश्मीरमधली दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला होता.