अरूणभाई आचरणानेही मोठे

0

चोपडा । माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी हे विधानसभेतील बहुआयामी नेतृत्वाची छाप आहेत. ते केवळ भाषणाने नव्हे तर आचरणानेदेखील मोठे व्यक्तिमत्व असल्याचे गौरवोद्गार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. अरूणभाइर्ंच्या अमृत महोत्सवी कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. येथील प्रताप विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्यात ते पुढे म्हणाले की, राजकारणात आपली छाप सोडणार्‍या मोजक्याच व्यक्ती असतात. त्यातील अरूणभाई गुजराथी हे एक माझ्या स्मरणात आहेत. ते विधानसभा अध्यक्ष असतांना मी विरोधी पक्षाची भूमिका मांडायचो. त्यावेळी सभागृहाच्या कामकाजाविषयी वेळोवेळी त्यांचे प्रोत्साहन मला मिळायचे. त्या प्रोत्साहनपर काही चिठ्ठ्या मी आजदेखील सांभाळलेल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पथदर्र्शी मार्गदर्शन करणारे गुजराथी यांच्यासारखी माणसे राजकारणात फार दुर्मिळ असतात म्हणून आज अर्धा डझन मंत्री या सोहळ्यासाठी मनापासून आले असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

गुजराथींना राज्यपाल करा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांंनी आपल्या शीघ्रकाव्याने उपस्थितांना हसवले. अरूणभाई गुजराथी यांना राज्यपाल करावे, यासाठी शरद पवार व नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असल्याने ते शक्य आहे असे ना.आठवले म्हणाले.

चोपड्याचा लौकीक वाढवला
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, चोपडा शहराचा महाराष्ट्रात नावलौकीक करणारा नेता अरूणभाई गुजराथी आहेत. लोकांना दुःखामध्ये धीर देणारा हा नेता आहे. शरद पवारांवरदेखील अनेकदा वेडीवाकडी टीका झाली मात्र ते विचलित झाले नाहीत. टीका करणारे गेलेत मात्र शरद पवार आजदेखील ताठ मानेने जगत असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

न मागता पवारांनी संधी दिली
सत्काराला उत्तर देतांना अरूणभाई गुजराथी म्हणाले की, नगराध्यक्ष ते विधानसभा अध्यक्ष हा माझा राजकीय प्रवास मतदारसंघातील मतदारांमुळेच शक्य झाला. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाहीत. माझे जीवन पुस्तकासारखे आहे आणि पुस्तकाचे वय होत नाही. शरद पवारांची पावती मिळाली की माणूस मोठा होतो. न मागता मिळालेली संधी मला शरद पवार यांनी दिली.

दुधातून प्रगतीची संधी शोधा
ना.हरिभाऊ बागडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी या जिल्ह्याचा दुधाचा विषय मार्गी लावावा. एक ब्रँड व्हावा जेणेकरून चांगले स्ट्रक्चर उभे राहील. आठवड्याला पैसा मिळविणारा व्यवसाय म्हणून दुधाच्या व्यवसायाची ओळख आहे. या व्यवसायामुळे आत्महत्त्याचे प्रमाणदेखील कमी होवू शकते म्हणून हा व्यवसाय रूजला पाहिजेे.

निष्ठेची पावती मिळाली
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनिष्ठ असल्याची पावती अरूणभाई गुजराथी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत दिलेली असल्याने ती सर्वपक्षीय मंत्री, नेते उपस्थित राहिल्याने आज खर्‍या अर्थाने मिळाली. भाईंनी राजकारणात कटूता येऊ दिली नाही. विरोधकांना सभागृहात शांत करण्याची किमया अरूणभाई गुजराथी यांनाच अवगत असल्याचेही ते म्हणाले.

मान्यवरांची उपस्थिती
व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजीमंत्री विजय नवल पाटील, खासदार श्रीमती रक्षा खडसे, आ. हरिभाऊ जावळे, माजी खा. ईश्‍वरलाल जैन, डॉ. उल्हास पाटील, नगराध्यक्षा सौ. मनिषा चौधरी, जि.प.अध्यक्षा सौ. उज्वला पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. चंद्रकांत पाटील, हरिभाऊ बागडे, सुशिलकुमार शिंदे, रामदास आठवले, गुलाबराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

अरूणभाई आचरणानेही मोठे
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात शरद पवार म्हणाले की, अरूणभाई गुजराथी यांनी राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केले आहे. भाई विधानसभा अध्यक्ष असतांना मला त्यांची काळजी असायची. विरोधक अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत यायचे मात्र लोककल्याणाचे काम करतांना विरोधकांनादेखील योग्य न्याय अरूणभाई गुजराथी यांनी दिला. गुजराथी कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सहभाग असलेले कुटुंब आहे. अरूणभाईंना विविध संस्था दिल्या. नगरविकासमंत्री केले. तेे खाते सांभाळतांना आरोप-प्रत्यारोप खूप होतात मात्र गुजराथी यांच्याविरूद्ध एकही आरोप त्याकाळात झाला नाही आज पिकाला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. नोटाबंदीला सगळ्यांचा पाठींबा होता मात्र आज बराच काळ गेला तरी जिल्हा सहकारी बँकेतील नोटा बदलून मिळत नाही. शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी भटकावे लागत आहे. ही चिंतेची बाब आहे. मी कुठल्याही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला गेलो म्हणजे त्या बँकेची कुंडली मागवतो आणि त्या बँकेचे नाडी परिक्षण एनपीएवरून होत असते.

मात्र चोपडा पिपल्स बँकेची शून्य थकबाकी असून अशा बँका राज्यात खूप कमी असल्याचे पवार म्हणाले. चोपड्याच्या विकासासाठी माजी आ.कै.माधवराव गोटू पाटील, तत्कालीन शिक्षणमंत्री कै.शरदचंद्रिका पाटील, माजी आ.सुरेश पवार, कै.सुशिलाबेन शहा यांचा नामोल्लेख करीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

स्मरणिकेचे प्रकाशन
यावेळी बँकेच्या स्मरणिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. आ.सतीष पाटील, माजी आ.दिलीप वाघ, माजी खा. वसंतराव मोरे, माजी आ.अरूण पाटील (यावल) माजी आ.जगदीशचंद्र वळवी, रमेश महाजन, राजवर्धन कदमबांडे (धुळे), दिलीपराव सोनवणे, माजी आ.सुरेश पाटील, गुलाबराव देवकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, विठ्ठलहास गुजराथी, आ. चंद्रकांत सोनवणे, जीवन चौधरी, उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, राजू बिटवा, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, आशिष गुजराथी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार सुधीर गाडगीळ यांनी मानले.