केरळमध्ये पूर स्थिती झाली आहे आणि आपला बांधव अडचणीत आहे,हे समजातक्षणी आपण ही आपल्या परीने मैदानात उतरायला पाहिजे याची खूनगाठ मनाशी बांधली होती. १५ अॉगस्टच्या सकाळी सुभाष वारे सरांकडून १९९३ च्या किल्लारी भूकंपातील कांही गोष्टींवर सरांनी गप्पांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आणि त्यावेळेस “युवा दक्षता समिती”च्या माध्यमातून त्यांनी काय कार्य केले होते याचा अनुभव माझा मिञ मयूर डुमने आणि माझ्या समोर मांडला व या सर्वांवर एखाद पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली,हा किस्सा येथे मुद्दामहून सांगतोय कारण की,समाजासाठी स्वतःला वाहून घेणारी माणसं आज सुध्दा आपणामध्ये आहेत आणि ते आमच्या सारख्या युवकांसाठी प्रेरणादायक ठरतात,त्याच बरोबर १९९३ ला जो भूकंप झाला,त्याच परिसरातून मीयेतअसल्याकारणाने केरळवासीयांबरोबर एक भावनिक किनार जोडलेली होती,आणि त्यामध्येच आमच्या मुरूमकरवासीयांनी फुलं ना फुलाची पाकळी म्हणून २४००० रूपयांची मदत केली,त्यामुळे या कामासाठी मला अधिकच बळ मिळालं.
मिञ योगेश जगताप याच्या माध्यमातून ‘CYDA’ या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क आला व मट्टम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची १५ लोकांची टिम केरळला येऊन पोंहचली,यामध्ये आम्ही तीन गोष्टींवर लक्ष द्यायच ठरवलं पहिले म्हणजे,”मानसिक आधार,स्वच्छता आणि आरोग्य”इथला बांधव जो मानसिक दृष्ट्या खचला आहे त्याला आम्ही तुझ्यासोबत आहोत म्हणून आधार द्यायच काम आज केलं,
हे करत असताना भाषेची अडचण आलीच परंतू एका विशिष्ट टप्प्याला भाषेपेक्षा भावना जवळच्या वाटतात आणि यांनी आम्हां सर्वांना तितकेच आपलेपणाने जवळ घेतलं हे सांगाव लागेलं.
दुसरा मुद्दा स्वच्छतेचा तर,
आज आम्ही १३ लोकांच्या घरची स्वच्छता केली,त्यामध्ये बहुतांश कुटुंबात वयोवृध्द आणि लहान मुलं असल्याकारणाने त्यांना ही काम जमत नव्हती,परंतू इथल्या ज्या कुटुंबात तरूण मुलं आहेत तेथील परिवारांनी स्वतःहोऊन स्वच्छता केली व आम्ही आपलेपणाने त्यांची मदत करण्यासाठी पुण्याहून आलोय म्हणून आमचं आदरातिथ्य केलं.आणखी एक गोष्ट इथला माणूस किती स्वावलंबी,शिस्त,चिकट व स्वच्छताप्रिय आहे हे सुध्दा समजले.बाकी सर्वधर्म समभावच्या गप्पांच गुऱ्हाळ आपल्याइकडे खूप चालतं परंतू इथे खऱ्या अर्थाने आम्हाला तो जगता आला,हिंदू-मुस्लिम ख्रिश्चन सर्वच बांधव आज आमच्यासाठी तितकीच जवळची होती आणि आम्हाला प्रत्येकाच्या घरात जायला मिळालं,माणूसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे याची प्रत्यक्ष प्रचेती आली.ज्यांच्यासाठी आम्ही काम करू शकलो त्याच्या चेहऱ्यावरील स्मितहस्य आम्हाला कुठे तरी केलेल्या कामाची पावती देत होतं . आम्ही केलेल्या कामानंतर इथल्या प्रत्येक नागरिकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कित्येक पटीमध्ये सकारात्मक आहे, हे पावलोपावली जाणवत होतं.
आमचा तिसरा मुद्दा
हा आरोग्यासंदर्भातला आहे,तर उद्या या ठिकाणी एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे,तर त्यामध्ये ही आमचा सहभाग असणार आहे. त्याचबरोबर येथील प्रशासकीय अधिकारी,पंचायत समिती सदस्य,सभापती यांना टिचभर ही अभिमान वा गर्व नाही,अगदी जमिनीशी जोडलेली ही माणसं आमच्यासोबत पडेल ती काम करत आहेत.असो आम्ही आत्ता कुठं सुरूवात केली आहे,आणखी भरपूर काम बाकी आहे.
विंदांनी म्हटल्याप्रमाणे,
“देणाऱ्याने देत जावे,|
घेणाऱ्याने घेत जावे ||
घेणाऱ्याने घेता घेता
एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे||
–विश्वभूषण करूणा महेश लिमये