शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
बोदवड : तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना चा कहर वाढत असून एकट्या करंजी या गावातील वीस जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. करंजी येथील ३९ वर्षीय पॉझिटिव्ह आलेल्या त्या रुग्णाच्या संपर्कातील तब्बल 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता बोदवड तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ३७ झाली आहे व दोन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील एकूण बरे झालेलेरुग्ण ११असून, उपचाराधीन रुग्ण २४ आहेत. कोल्हाडी सुद्धा रडारवर तालुक्यातील कोल्हाडी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यामुळे कोरोना विषाणूने ग्रामीण भागात आता आपले हातपाय पसरवायला सुरवात केली आहे.तालुक्यातील कोल्हाडी येथील ६५ वर्षीय नागरिकाला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.मात्र दि.२० शनिवार रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचा सकारात्मक अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाल्याने आज सदर व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे.तर गावातील त्यांच्या संपर्कातील नागरिकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.व संपर्कात असलेल्या व लक्षणं जाणवत असलेल्या दोन व्यक्तींचे सुद्धा अहवाल आज येणे अपेक्षित आहे.
करंजी व कोल्हाडी गावात पंचायत समितीच्या आरोग्य विभाग व ग्रामपंचायत विभागाच्या वतीने उचित उपाययोजना परिसरात करण्यात आल्या. यावेळी ग्रामसेवक,आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत सदस्य,आशा सेविका उपस्थित होत्या.