शिरपूर। तालुक्यातील अर्थे गावाजवळ समारोसमोर झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवार 5 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यप्रदेशातील खंडवा येथील नरेश नामक यांचे नरेश सिट कव्हर या नावाने होलसेलचे दुकान आहे. तेथून सदरचा माल हा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी स्वतःच्या वाहनाने येत असतो. शनिवारी 5 रोजी पिकअप गाडी क्रमांक एम.पी.12-जीए-497 माल घेवून चालक राजेश परशुराम चव्हाण (30) व सेल्समन भरतकुमार वासुदेव गोस्वामी (28) दोघे राहणार खंडवा हे दोंडाईचा येथे आले होते. तेथे माल दिल्यानंतर ते सारंगखेडा मार्गे शिरपूरकडे येत होते. त्यावेळी मार्गावरील अर्थे गावालगत समोरून भरधाव वेगात येणारी ट्रक क्रमांक एम.एच. 18 एए-5991 ने जबर धडक दिली. या अपघातात चालक राजेश चव्हाण व सेल्समन भरतकुमार गोस्वामी हे दोघे जागीच ठार झालेत.
हा अपघात इतका भयानक होता की, पिकअप गाडीचा पुढील भाग अक्षरक्षः चक्काचूर झाला. तर मागील ट्रॉला हा देखील चेसीसवरून तुटून बाजूला फेकला गेला आहे. घटनेचे वृत्त कळताच शिरपुरातील दाऊद भारमल, मुस्तफा बोहरी, विजय मोटवानी, हिसमतराव मोटवानी, संजय चौरे आदींनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली. दरम्यान खंडवा येथून मयत गोस्वामींचे काका व भाऊ यांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतला.