खानिवडे : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारश्याचा ठेवा असलेल्या व सागरी संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची कामगिरी बजावलेल्या अर्नाळा आरमारी किल्ल्याची अभ्यास सफर ९ एप्रिल रोजी अर्नाळा स्मरणदिन समिती व किल्ले वसई मोहीम परिवाराने आयोजित केली आहे. जंजिरे अर्नाळा किल्ल्यास इ. स. १७३७ ते २०१७ या कालखंडाप्रमाणे २८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून ९ एप्रिलला किल्ल्याच्या गत ज्ञात अज्ञात वीरांना स्मरण करून मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच किल्ल्याची उभारणी, वास्तुविशेष, स्थळ महत्व, ऐतिहासिक महत्व व अर्नाळा प्रांताच्या आरमारी संघर्षाचा मागोवा घेण्यात येणार असून ठाणे परिसरातील इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत हे माहिती देत किल्ला सफर अभ्यास घडवणार आहेत.