अलंकापुरीत मंगळवारी कार्तिकी एकादशी

0

आळंदी : संतसम्राट ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 722 व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी मंगळवारी (दि.14) लाखो वारकरी वैष्णव भाविकांच्या साक्षीने व ज्ञानोबा माऊली नाम जयघोषात साजरी होत आहे. श्रींचे संजीवन समाधी सोहळ्यांतर्गत कार्तिकी यात्रा कालावधीतील विविध धार्मिक कार्यक्रमात सोमवारी (दि.13) श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांचे महापूजा दर्शन, महानैवेद्य झाल्यानंतर वीणा मंडपात हभप गंगूकाका शिरवळकर आणि हभप धोंडोपंतदादा अत्रे यांच्यावतीने कीर्तनसेवा झाली. धुपारतीनंतर हभप वासकर महाराज आणि हभप. वाल्हेकर महाराज यांच्यातर्फे कीर्तनसेवा हरिनाम गजरात झाली. भाविकांनी श्रवणसुखाचा आनंद घेतला. यावेळी भाविकांच्या गर्दीने तीर्थक्षेत्र फुलून गेले होते. ठिकठिकाणी भक्तीला उधाण आलेले दिसले.

आज श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा
अलंकापुरीतील कार्तिकी यात्रेतील कार्तिकी एकादशी मंगळवारी (दि.14) आळंदीत साजरी होत आहे. त्यानिमित्त आळंदी मंदिरासह सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात माऊली मंदिरात पहाटपुजेत श्रींना पवमान अभिषेक व पूजा, दुधारती, 11 ब्रम्हवृंदांचा वेदमंत्र जयघोषात पूजा, महानैवेद्य, दुपारी एकच्या सुमारास श्रींचे पालखीची नगरप्रदक्षिणा, धुपारती, परंपरेने संतोष मोझे (सरकार)यांच्यावतीने हरी जागर होणार आहे. भाविकांना श्रींचे दर्शन पहाटपूजेनंतर थेट सुरु होणार आहे. बुधवारी (दि. 15) आळंदीत श्रींचे रथोत्सव हरिनाम गजरात गोपाळपुरातून सुरु होणार आहे. तत्पूर्वी परंपरेने प्रांत आयुष प्रसाद यांच्याहस्ते श्रींची महापूजा पहाटे होईल.

दर्शनबारीची पायवाट खडतर
यावर्षी नवीन दर्शनबारीसह आरक्षित जागेतदेखील सुमारे 20 हजार भाविकांचे दर्शनास येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्रींचे दर्शनाची बारी आराधना हॉटेलच्या पुढे गेल्याने रस्त्याचे दुतर्फा दुरवस्थेने धुळीचे साम्राज्याने भाविकांची पायवाट बिकट झाली. अनवाणी पायाने आलेल्या भाविकांना खड्यांच्या अस्तित्वाने गैरसोयीस सामोरे जावे लागले. अनेक भाविकांनी रस्त्याच्या दुरवस्थेने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी फवारण्याची मागणी केली.