एफ.डल्ब्यू.शिलँडर यांनी 1915 मध्ये केली उभारणी
भुसावळ- शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या मॉडर्न रोडवरील मुख्य पोस्ट ऑफीसच्या मागील ‘अलायन्स मिशनचे अलायन्स मराठी चर्चला शंभर वर्षांचा इतिहास आहे. अलायन्स मिशनचे हे मातृचर्च म्हणून ओळखले जाते. मिशनरी एफ. डब्ल्यू. शिलँडर यांनी 1915 मध्ये चर्चची उभारणी केली. या चर्चचे पहिले धर्मगुरु रेव्ह.आर कटलर यांनी सेवा बजावली. त्यांच्यानंतर सी.चव्हाण, रेव्ह.वाय.टी.अघमकर, एस.एल.रायबोर्डे, आर.एच.भांबळ यांनी सेवा बजावली. सध्या पास्टर स्वप्नील नाशिककर हे सेवा
बजावत आहेत.
भुसावळातील ऐतिहासीक चर्च
हे चर्च भुसावळ शहरातील एक ऐतिहासिक चर्च आहे. या चर्चचा समावेश अकोला येथील पीटीआरडी-1 सिनड या संस्थेत होतो. या चर्चची सभासद संख्या 400 ते 500 इतकी आहे. या चर्चची रचना ही पवित्र बायबल शास्त्रानुसार करण्यात आली आहे. आहे. 1977 मध्ये या चर्चचा विस्तार झाला होता.
पवित्र चिन्ह वधस्तंभ
या चर्चच्या दर्शनी भागावर ख्रिस्ती विश्वासधारकांचे पवित्र चिन्ह ‘वधस्तंभ’ उभारलेला आहे. वधस्तंभाच्या खाली कंगोर्यांमध्ये पीतळी जुनी मोठी घंटा आहे. चर्चला एक पूलपीट आहे. त्यावरुन धर्मगुरू चर्च मंडळीला पवित्र बायबलचा संदेश देतात. बसण्यासाठी जुन्या पद्धतीचे लाकडी बाक व खूर्ची आहेत. या चर्चला दोन विंग आहेत. तरुण संघाला धार्मिक गीत गाण्यासाठी व्यवस्था आहे. या चर्चच्या परीसरात धर्मगुरुंसाठी स्वतंत्र निवासस्थान आहे.
चर्च माध्यमातून संडे स्कूल
चर्चच्या माध्यमातून संडे स्कूल चालविली जाते. प्रभू भोजन विधीची भांडी आहेत. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभू भोजन देण्यात येते. यात प्रभू येशू ख्रिस्त यांच्या शरीराचे दर्शक म्हणून भाकर व त्यांनी अखिल मानव जातीच्या पाप क्षालनासाठी सांडलेल्या रक्ताचे दर्शक म्हणून द्राक्षारस देण्यात येतो. हा विधी प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील अर्पणाच्या स्मरणार्थ केला जातो. या चर्चने नुकतेच शंभर वर्ष पूर्ण केले.