पिंपरी : भुलीकरिता नवनवीन तसेच अधिकाधिक सुरक्षित औषधांचा व भूलतंत्राचा शोध सुरू झाला. जसजशी भूल सुरक्षित होत गेली तसतसे अधिक गुंतागुंतीच्या आणि दीर्घ काळ चालणार्या शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. शस्त्रक्रियेदरम्यान एवढी महत्त्वाची भूमिका पार पाडणारे भूलशास्त्र व ते देणारा भूलतज्ज्ञ सर्वसामान्यांसाठी अपरिचितच राहिले आहेत. भूलशास्त्रात अनेक पातळ्यांवर बदल झाले. अलीकडे तर हे वेदनामुक्तीचे विज्ञान पूर्णपणे आधुनिक झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. आकुर्डी येथे अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संघटना पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने भूलशास्त्र प्रदर्शन-भूलतज्ज्ञ आपल्या भेटीला हे दृक-चित्र पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अनिल अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पिंपरी-चिंचवड़ भूलतज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ.शोभा जोशी, भूलतज्ज्ञ संघटनेच्या सचिव डॉ.स्मिता कुलकर्णी, डॉ.संजय देवधर, डॉ.सुधीर भालेराव, डॉ.दिलीप कामत आदी उपस्थित होते. आकुर्डी येथील भालेराव कान, नाक, घसा हॉस्पिटल येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. अशा प्रकारचे पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. या प्रदर्शनाची संकल्पना डॉ.माया भालेराव यांची असून जनजागृतीपर भूलशास्त्रावर प्रकाशझोत टाकणारे प्रदर्शन आहे.
शास्त्र झाले आधुनिक
डॉ. अवचट पुढे म्हणाले की, नवनवीन पद्धती, औषधी, तंत्रांसह वेगवेगळ्या शाखांनी भूलशास्त्र समृद्ध होत आहे. सर्व शस्त्रक्रिया भूल दिल्याशिवाय होत होत्या. पुढे भूलशास्त्रात अनेक पातळ्यांवर बदल झाले. अलीकडे तर हे वेदनामुक्तीचे विज्ञान पूर्णपणे आधुनिक झाले आहे. 16 ऑक्टोबर 1846 मध्ये इंग्लंडमध्ये विलियम मॉर्टेन यांनी जगात पहिल्यांदाच रुग्णास भूल देण्याचा प्रयोग केला. त्यानंतर जगभरात भूल देण्याची पद्धत रूढ झाली. त्यापूर्वी सर्व शस्त्रक्रिया भूल दिल्याशिवाय होत होत्या. साधी इंजेक्शनची सुई किंवा टाचणी टोचली, तर माणूस कळवळतो. तर कुठलीही शस्त्रक्रिया भूल दिल्याशिवाय केल्यास काय वेदना होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. मात्र, अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्वी म्हणजेच भूलशास्त्राच्या जन्मापूर्वी होत होत्या. भूल दिल्याशिवाय शस्त्रक्रियेचा विचार केला, तर भूलशास्त्राचे खरे महत्त्व कळते.
भूलतज्ज्ञाचे कौशल्य
रुग्ण हा खरोखर भूल देण्यासाठी आणि त्यानंतरच्या शस्त्रक्रियेसाठी योग्य आहे का, सर्व प्रकारचे आजार-वय-गुंतागुंत लक्षात घेऊन कुठल्या रुग्णाला नेमक्या किती प्रमाणात भूल द्यायची, भूल दिल्यानंतर रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत आणि सर्व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाच्या प्रकृतीचे व्यवस्थापन करणे, अशा सगळ्या आघाड्यांवर भूलतज्ज्ञाचे खरे कौशल्य पणाला लागते. मात्र, अजूनही भूलतज्ज्ञाला दुय्यम वागणूक मिळते, अशी खंतही व्यक्त केली. यावेळी भूलशास्त्र म्हणजे काय याबबत डॉ.शोभा जोशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.माया भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुमित लाड़ यांनी केले.