पिंपरी-चिंचवड । पिंपरी पोलिसांच्या तपासी पथकाने एका अल्पवयीन आरोपीस दुचाकी व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात सोमवारी ताब्यात घेतले. संबंधित मुलाकडून मोबाईल व दुचाकी चोरीचे 10 गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाने पाच मोबाईल पैकी एक ब्लॅकबेरी, एक लेनेवो, दोन ओप्पो, एक सॅमसंग असे 38 हजार रुपयांचे पाच मोबाईल तसेच पिंपरी येथील दोन, भोसरीतील एक, सांगवी येथील दोन अशा 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकीदेखील चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या मुलाकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.