मध्यप्रदेशातील तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपींच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; अत्याचारातून पीडीता गर्भवती
भुसावळ- मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील टेमरूमाला गावातील 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून रेल्वेने पसार होत भुसावळात आश्रयाला आलेल्या दोघा आरोपींच्या संशयास्पद हालचालीवरून भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्याची घटना सोमवारी रात्री 11 वाजता घडली. रेल्वे तिकीट बुकींग खिडकीजवळ आरोपींचा संशयास्पद वावर असल्याने गस्तीवरील कर्मचार्यांनी त्यांची खोलवर विचारपूस केल्यानंतर आरोपींनी अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करून ती गर्भपती राहिल्याची कबुली दिल्याची माहिती दिल्याने पोलिसांनाही धक्का बसला. लोहमार्ग पोलिसांनी चोपणा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर आरोपींविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथील पोलिसांनी मंगळवारी दुपारी आरोपींचा ताबा घेतला.
फुस लावून तरुणीला जाळ्यात ओढले
तापीचे उगम क्षेत्र असलेल्या मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात टेमरूमाला गाव असून या गावातील आठवीत शिकणार्या 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर गावातील किराणा दुकानदार गौरीशंकर बिहारीहाल कुदारे (27) व विरेंद्र बिहारी नागले (30, शोभापूरा) यांनी अत्याचार केला तसेच या घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडीतीने घटना कुणालाही सांगितली नाही याच बाबीचा आरोपींनी फायदा घेत दोन महिन्यांपर्यंत अत्याचार केल्याने पीडीता गर्भवती राहिली. 6 जानेवारी रोजी आरोपींनी पुन्हा दुष्कृत्य करून रेल्वेने भुसावळ गाठले. आरोपी रेल्वेने मुंबईला जाण्याच्या बेतात असतानाच लोहमार्ग पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशीकामी त्यांना ताब्यात घेतल्याने अत्याचाराचे बिंग फुटले. चोपणा पोलिस ठाण्याचे एसआय बिरेंद्र पाटील व सहकार्यांनी मंगळवारी आरोपींचा ताबा घेतला.
यांचा कारवाईत सहभाग
भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गढरी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भरत शिरसाठ, मधुकर न्हावकर, हवालदार जगदीश ठाकूर, नितीन पाटील, नाईक जयकुमार कोळी, कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, नाईक स्नेहा अडकणे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.