जळगाव : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी जळगावातील संशयीताविरोधात गुजरातमधील अलीस ब्रिज पोलिस ठाण्यात अत्याचार व पोस्कोन्वये गुन्हा दाखल होता. न्यायालयाने संशयीताविरोधात वॉरंट काढल्यानंतरही तो हजर होत नसल्याने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आली व एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली. मुकेश अशोक पाटील (25, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अत्याचार प्रकरणी दाखल आहे गुन्हा
अहमदाबाद येथील अलीस ब्रिज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोपी मुकेश पाटील याच्यावर आरोप आहे. संशयीत वॉरंटमध्ये पसार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास रविवारी दुपारी अडीच वाजता अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाडे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, मिलिंद सोनवणे, हेमंत कळसकर, विकास सातदिवे, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.