नंदुरबार। जिल्ह्यातील शासकिय यंत्रणांनी प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम तसेच अल्पसंख्याक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन यांनी दिले आहेत.हुसेन नंदुरबार जिल्हा दौर्यावर होते.त्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, जिल्हा पोलिस अधीक्षक राजें,सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बागूल (महिला व बालकल्याण), जालिंदर पठारे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी, राहुल वाघ आदी उपस्थित होते.
अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना 20 लाखांचा निधी मंजूर
हसेन यांनी सांगितले, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना 2016- 2017 मध्ये 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मंजूर निधीतून सूचविलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत. हुसेन यांनी यावेळी अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम, अल्पसंख्याक बहुल शासनमान्य अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित अपंग शाळा, विना अनुदानित शाळा, कनिष्ठे महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाळांमधील पायाभूत सोयी सुविधा, अल्पसंख्याक समाजातील तरुणांसाठी पोलिस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी जिल्ह्यात अल्पसंख्यांक विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली.