यवत । पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह व वादळी वार्यांसह गेली दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असून या पावसाचा फूल उत्पादक शेतकर्यांना फटका बसत आहे. अगोदरच फुलांचे बाजार कमी असल्याने फूल उत्पादक शेतकरी अडचणीत आला असतानाच या अस्मानी संकटाचा सामना करण्याची वेळ आता त्या शेतकर्यांवर आल्याचे चित्र दिसत आहे.
प्रतवारी नसल्यामुळे अल्प बाजारभाव
मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून याकाळात सर्वच फुलांना बाजारात चांगली मागणी असते. सध्या बाजारात शेवंती 60 ते 70 रुपये प्रति किलो, बेंगलोर 50 ते 60 रुपये, झेंडू 15 ते 20 रुपये, गुलछडी 50 ते 60 रुपये या फुलांना बाजारभाव आहे. परंतु या अवकाळी पावसामुळे फुलांना प्रतवारी न राहिल्यामुळे अल्प बाजारभाव मिळत असल्याचे फुल उत्पादक शेतकरी राहुल बिचकुले यांनी सांगितले. अगोदरच शेतकर्यांच्या पालेभाज्यांना व आदी पिकांना बाजारभाव नसल्याने सुलतानी संकटांनी शेतकरी पुरता हतबल झाला असतानाच या अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
फुलांवर करप्या व अळीचा रोग
राज्यातील बहुतांश भागात हा अवकाळी पाऊस पडला असून या पावसाचा फुलांसह ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर वादळी वारे व पावसामुळे ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनाचा मोठ्या प्रमाणात फटका उत्पादित शेतकर्यांना बसणार आहे. फुलांचे उत्पादन दौंड, पुरंदर, बारामती, हवेली आदी तालुक्यांसह अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून यामध्ये शेवंती, बिजली, अस्टर, कापरी, बँगलोर, झेंडू, गुलछडी, मोगरा यासह आदी फुलांचे उत्पादन घेतले जात आहेत. परंतु दोन ते तीन दिवसांपासून वादळी वार्यासह पडणार्या अवकाळी पावसामुळे फुलझाडे जमीनदोस्त झाली असून ही फुले चिखल मातीत व पावसाच्या पाण्यात भरल्यामुळे सडू लागली असून या फुलांना प्रतवारी न राहिल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. या फुलांचा रंग लाल पडू लागला असून करप्या व अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. परिणामी उत्पादनात कमालीची घट होणार असल्याने फूल उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.